नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ६७ लोकांवर कारवाई करून ५८२०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्या प्रकरणात २३ लोकांवर कारवाई करून ९२०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी चौघांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्यामुळे चौघांवर कारवाई केली असून, १६०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर कचरा टाकल्याने दोघांवर कारवाई करून ४००० रुपये दंड वसुल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, स्टेज टाकून अडविल्या प्रकरणी ५ लोकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.