लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक पार पडली. निकाल लागला. परंतु निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचा प्रचाराचा खर्चाचा हिशेब अजूनही पूर्णपणे आलेला नाही. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना २२ जूनपर्यंत खर्चाची माहिती सादर करायची आहे. ही माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे.नागपूर लोकसभा मतदार संघात ३० तर रामटेक लोकसभा मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. निवडणुकीकरिता उमेदवारास स्वतंत्र बँक खाते उघडून त्यामार्फत खर्च करायचा होता.चार टप्प्यात उमेदवारांना खर्चाची माहिती सादर करणे आवश्यक आहे. तीन टप्प्यातील माहिती उमेदवारांनी सादर केली आहे. उमेदवारांच्या खर्चावर पाळत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मुदगल यांनी आयोगाच्या सूचनेवरून एक स्वतंत्र समिती तयार केली. समितीच्या प्रमुख मोना ठाकूर होत्या. उमेदवारांनी तीन टप्प्यात दिलेली खर्चाची माहिती आणि समितीमार्फत काढण्यात आलेला खर्चाचा लेखाजोखा यात मोठी तफावत होती. दोन्ही मतदार संघातील प्रमुख उमेदवार यांनी दिलेली खर्चाची माहिती समितीने काढलेल्या खर्चात तर लाखोंची तफावत दिसून आली. समितीने सर्व उमेदवारांना नोटीस बजावून बिल सादर करण्यास सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार अनेक उमेदवारांनी खर्चाचा गोषवाराच अद्याप दिला नाही. आता जिल्हाधिकारी यांनी सर्व उमेदवारांना २२ जूनपर्यंत खर्चाची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. उमेदवारांना खर्चाची अद्ययावत नोंदवही, खर्चाचे मूळ प्रमाणके व १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर विहित नमुन्यातील माहिती भरून द्यायची आहे. ही माहिती सादर न करणाºया उमेदवारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.