मनपाची शोधमोहीम : दंड न भरल्यास मालमत्ता करात लागून येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. यात मोकळ्या भूखंडावर साचलेला कचरा, पावसाचे पाणी व घाणीमुळे भर घातली आहे. याचा विचार करता कचरा साचून असलेल्या भूखंडधारकांचा शोध घेऊन त्यांना दंड आकारला जाणार आहे. शोध न लागल्यास मालमत्ता करात दंडाची रक्कम जोडली जाणार आहे.
भूखंडधारकांवर कारवाई करण्यासाठी झोननिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरात १ लाख ३५ हजार मोकळे भूखंड असल्याचे निदर्शनास आले. परंतु भूखंड नेमके कोणाच्या मालकीचे आहेत, याचा शोध लागलेला नाही. भूखंडधारकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनापुढे आहे.
शहरात वाढत असलेल्या डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी शहरात स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यानुसार मोकळ्या भूखंडावरील कचरा साफ केला जाणार आहे. झोन कार्यालयांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. कचरा साचून असलेल्या भूखंडधारकांना नोटीस बजावल्या जात आहेत. ठावठिकाणा नसलेल्या भूखंडधारकांचा शोध घेतला जात आहे. परंतु शोध न लागलेल्या भूखंडधारकांना दंड कसा आकारणार, असा प्रश्न आहे. नोटीसला सात दिवसांत प्रतिसाद न देणाऱ्या भूखंडावर ५० रुपये प्रति वर्गमीटर दराने दंड वसूल केला जाणार आहे.
....
झोननिहाय मोकळ्या भूखंडांची संख्या
झोन मोकळे भूखंड
लक्ष्मीनगर - ११४६२
धरमपेठ - ६८३८
हनुमाननगर - १७ ५२८
धंतोली - ५५८
नेहरूनगर - २६६१५
गांधीबाग - ५३५
सतरंजीपुरा - ३९६२
लकडगंज - २०४९२
आसीनगर - २६७२१
मंगळवारी - १००००