खोटे आरोप केल्यामुळे विद्यार्थिनीला हायकोर्टात दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:28 PM2019-04-24T23:28:39+5:302019-04-24T23:29:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर खोटे आरोप केल्यामुळे एका विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एक हजार रूपये दंड ठोठावून दणका दिला. तसेच, दुसऱ्या बाजूने अंतर्गत परीक्षेची विनंती मान्य करून त्या विद्यार्थिनीला दिलासाही दिला. संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर खोटे आरोप केल्यामुळे एका विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एक हजार रूपये दंड ठोठावून दणका दिला. तसेच, दुसऱ्या बाजूने अंतर्गत परीक्षेची विनंती मान्य करून त्या विद्यार्थिनीला दिलासाही दिला. संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
प्रीती फडके असे विद्यार्थिनीचे नाव आहे. पदव्युत्तर शिक्षणशास्त्राच्या अंतर्गत परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आल्यामुळे तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डॉ. वैष्णव यांनी पूर्वग्रहदूषित भावनेतून मूल्यमापन केले असा आरोप केला होता. विद्यापीठ व डॉ. वैष्णव यांनी तिचे आरोप पुराव्यानिशी निरर्थक ठरवले. परिणामी, न्यायालयाने तिला सर्व आरोप मागे घेण्याची संधी दिली. त्यानंतर तिने सर्व आरोप मागे घेतले. परिणामी, न्यायालयाने याचिकेवर पुढील कार्यवाही केली व दोन महिन्यात याचिकाकर्तीची अंतर्गत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यास सांगितले. याचिकाकर्तीतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर, विद्यापीठातर्फे अॅड. पुरुषोत्तम पाटील तर, वैष्णव यांच्यातर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.