ग्राहक मंचचा दणका : कथित वीज ग्राहक प्रतिनिधींना चपराक नागपूर : स्वत:ला वीज ग्राहकांचे प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्या काही जणांनी अर्जदार वीज ग्राहकाला हाताशी धरून यापुढे महावितरण विरोधात खोटी तक्रार दाखल केल्यास कंपनी किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्पर त्रास दिल्याबद्दल तक्रारदार वीज ग्राहक व त्याच्या प्रतिनिधीला नुकसान भरपाईपोटी दंड ठोठावण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल महावितरणच्या नागपूर येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना फुस लावून तसेच त्यांना आमिष दाखवून महावितरण विरोधात नुकसान भरपाईच्या खोट्या तक्रारी दाखल होत असल्याचे समोर आले आहे. महावितरण कंपनी आणि वीज कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून वीज ग्राहकाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून खोट्या तक्रारी दाखल करून त्यात पैसे कमाविण्याचा उद्योग काही कथित ग्राहक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. यासंदर्भात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल झालेल्या एका प्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली असून, त्यात महावितरणतर्फ़े करण्यात आलेल्या युक्तिवादात ग्राहक प्रतिनिधींनी सादर केलेले पुरावे हे खोटे असल्याचे आढळुन आले. यावेळी ग्राहकाने आपली महावितरण विरोधात कुठलीही तक्रार नसून आपण कुठलीही नुकसान भरपाई मागत नसल्याचे लिखित बयाण मंचापुढे दिले. यावर ग्राहक तक्रार निवारण मंचने निकालात नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाने कागदपत्रांची पूर्तता केली नाही तरीही नुकसान भरपाईसाठी ग्राहक प्रतिनिधीने अर्ज केला आहे, ग्राहक प्रतिनिधींच्या अशा सवयींमुळे महावितरणच्या अंतर्गत तक्रार निवारण मंचापुढे विनाकारण तक्रारींची संख्या वाढत आहे. अर्जदार आणि कथित ग्राहक प्रतिनिधींनी यापुढे खोटी तक्रार दाखल केल्यास तसेच कंपनी व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याबद्दल ग्राहक व त्याच्या प्रतिनिधीना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी लागेल. ग्राहक मंचच्या या निर्णयामुळे मध्यस्थ म्हणून वावरणाऱ्या दलालांना चांगलीच चपराक बसली आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणची पारदर्शी तक्रार निवारण यंत्रणा असून तेथे ग्राहकांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या जाते. यासाठी कुठल्याही मध्यस्थांची गरज नसते. (प्रतिनिधी)
विनाकारण त्रास द्याल तर दंड
By admin | Published: April 26, 2017 1:40 AM