लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्ती (दंड) माफ होणार आहे. मालमत्ता कराच्या ३१ मार्च २०२० पर्यंतच्या थकीत करावर व चालू वर्षातील कर ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी मनपाने अभय योजना -२०२० ही १५ डिसेंबरपासून लागू केली आहे. या योजनेंतर्गत संबंधित काळातील मालमत्ता करावरील शास्ती काही प्रमाणात माफ होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी केले आहे. यामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. अभय योजनेचा कालावधी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ असा राहील. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत कर असणाऱ्या तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने थकीत मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व करदात्यांनी केली होती.