स्मार्ट सिटी : उपविधी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणारनागपूर : महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवर कचरा टाकणे, जमा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही बाब विचारात घेता यावर नियंत्रण घालण्यासाठी महापालिका उपविधी तयार करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याने खुल्या जागेवर कचरा टाकण्याऱ्यांना दंड बसणार आहे. शहरातील कचरा दररोज उचलला जातो. परंतु अनेक लोकांना खुल्या जागेवर कचरा टाकण्याची सवय आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा टाकण्यावर नियंत्रण घालण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने उपविधी तयार केले आहे. सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर खुल्या जागेवर कचरा टाकण्यांना शास्ती लागणार आहे.२० जानेवारी २०१५ च्या सर्वसाधरण सभेत या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. हा उपविधी प्रकाशित करून यावर नागरिकांकडून आक्षेप वा सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु यावर नागरिकांकडून आक्षेप वा सूचना न आल्याने हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.उपविधीतील तरतुदीनुसार सार्वजनिक वा खासगी खुल्या जागेवर कोणत्याही स्वरूपाचा कचरा, धूळ, राख वा विटाचे तुकडे टाकल्यास महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार संबंधिताना महापालिके च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावता येईल. संबंधितावर पोलिसात तक्रार दाखल करता येईल. यात कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी वा गोठ्यातील दूषित पाणी याचा समावेश आहे. कायद्यानुसार परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची राहणार असल्याने शहर स्वच्छ राहण्याला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
खुल्या जागेवर कचरा टाकल्यास दंड
By admin | Published: October 21, 2015 3:38 AM