नागपूर: वाघांसाठी जगभर प्रसिद्ध असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प यापुढे फुलपाखरांसाठीही ओळखले जाणार आहे. या अभयारण्यात वाघांसाेबत ६ कुटुंबातील १२४ प्रजातींच्या फुलपाखरांचाही अधिवास तयार झाला आहे. २००८ ते २०२२ या १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीत केलेल्या अभ्यासानंतर हा अहवाल समाेर आला आहे. सेलू येथील डाॅ. आर.जी. भाेयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. आशिष टिपले आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अतुल देवकर यांनी ७४१ चाैरस किमी क्षेत्रफळात पसरलेल्या पेंच प्रकल्पात १४ वर्ष फुलपाखरांच्या प्रजातींचा अभ्यास करून १२४ प्रजातींचे अस्तित्व शाेधून काढले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी झुलाॅजिकल सर्वे ऑफ इंडियाने पेंचमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ६५ प्रजाती शाेधून काढल्या हाेत्या. या नव्या सर्वेक्षणात ६० नव्या प्रजातींची भर पडली आहे. ताडाेबा आणि बाेर जंगलात यापूर्वी अशाप्रकारचा सर्वे करण्यात आला हाेता, पण त्यांचा अहवाल अद्ययावत करण्यात आला नाही. पेंचचा अभ्यास अद्ययावत आणि संशाेधक विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींसाठी लाभदायक ठरणारा असल्याचे डाॅ. टिपले यांनी सांगितले.
अपरिचित असलेल्या प्रजातींचा अभ्यास करण्याची गरज आहे. फुलपाखरे परागणासाठी महत्त्वाची असतात, कारण ते आहारासाठी वेगवेगळ्या फुलांना भेट देतात, ज्यामुळे ते पर्यावरणाचे एक महत्त्वाचे घटक बनतात. हे कीटक पर्यावरणास संवेदनशील असतात आणि निवासस्थान, वातावरणातील तापमान आणि हवामानातील बदलांमुळे थेट प्रभावित होतात. त्यांची उपस्थिती पर्यावरणाचे चांगले सूचक आहे, असे मत डाॅ. टिपले यांनी व्यक्त केले.
काेणत्या ६ कुुटुंबातील प्रजाती?यातील सर्वाधिक ४३ प्रजाती या निम्फॅलिडी कुटुंबातील आहेत. त्यात १७ नवीन प्रजाती शाेधल्या. लिकाएनिडी कुटुंबातील ३४ प्रजाती असून त्यात २० नवीन आहेत. पिएरिडी कुटुंबातील १८ प्रजाती आहेत, ज्यात ६ प्रजाती नव्याने शाेधल्या आहेत. हेस्परायडीच्या १८ प्रजाती व १२ नव्या आहेत. पॅपिलिओनिडी कुटुंबातील १० प्रजाती असून ५ नव्या आहेत. एक प्रजाती रिओडिनिडी कुटुंबातील आहे. हे व्याघ्र प्रकल्प फुलपाखरांसाठी माैल्यवान अधिवास ठरले असल्याचे या अभ्यासातून समाेर येते.
महत्त्वाचे बिंदू- हे सर्वेक्षण पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात राखीव वनक्षेत्र, बफर झोन, तलावाचे किनारे, नदीकाठ आणि आसपासच्या क्षेत्राजवळ करण्यात आले होते.- फुलपाखरे शेतात, छायाचित्रणानंतर ओळखली गेली.- पाहण्याच्या संख्येवर आधारित, फुलपाखरांच्या प्रजातींचे वर्गीकरण करण्यात आले.- मानवी हस्तक्षेप आणि वावर असलेल्या उद्याने, वृक्षाराेपण, गवताळ प्रदेशात या फुलपाखरांची संख्या लक्षणीय कमी हाेती.- पावसाळ्यापासून हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत संख्या जास्त होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीस (मार्च) घट झाली.- पाण्याची कमतरता, झाडांवर कमी झालेली फुले आणि अन्नाच्या अभावाने संख्या कमी झाल्याचे म्हणता येते.