लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू झाली आहे. यासाठी कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कार्यालयांमध्ये अर्जदारांसाठी एक खिडकी उघडली जाईल. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (पीएम-एसवायएम) योजनेनुसार मंत्रालयात अंतिम अर्थसंकल्पात या पेन्शन योजनेची घोषणा झाली आहे. त्यानुसार आता वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दर महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळेल, ही माहिती ईपीएफओचे आयुक्त विकासकुमार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.आयुक्त विकासकुमार म्हणाले, ही पेन्शन योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू झाली आहे. परंतु याचे विधीवत उद्घाटन ५ मार्च रोजी सकाळी १०.४० वाजता अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेसाठी घर कामगार, धोबी, भूमिहीन मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, बिडी कामगार, हातमाग कामगार, चर्मकार, आॅडियो-व्हीडियो कामगार व अन्य व्यवसायातील कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये व त्यापेक्षा कमी आहे ते पात्र ठरतील. पात्र व्यक्ती ही नवी पेन्शन योजना (एनपीएस), कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य नको. पात्र व्यक्ती करदाताही असायला नको. अर्जदारांकडे नोंदणीसाठी आधार कार्ड, बचत बँकेचे खाते, जनधन खाते आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांना घेऊन ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मध्ये (सीएससी) नोंदणी केली जाऊ शकते. पहिल्यांदा पात्र व्यक्तीला अंशदान रक्कम रोख द्यावी लागेल. याची केंद्राकडून पावती मिळेल. पात्र व्यक्तीची ५० टक्के अंशदान रक्कमेवर केंद्र सरकार ५० टक्के रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करेल.