लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ व थकबाकी अजूनही मिळाली नाही. विशेष म्हणजे महालेखाकार यांनी वेतन पडताळणीस मान्यताही प्रदान केली आहे. परंतु आवश्यक असलेली टॅब प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे पेन्शनर्सना त्याचा लाभ व थकबाकी मिळू शकली नाही. यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सची पेन्शन थकबाकी पाच समान हप्त्यात देणार असल्याचे सांगितले.२०१६ पासून शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. परंतु त्यानंतर निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शनमध्ये सातव्या वेतन आयोगाचा लाभ व थकबाकी मिळालेली नाही. यासंदर्भात संघटनेने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी टॅब प्रणाली उपलब्ध नसल्याचे मान्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की, महालेखाकाराची मंजुरी प्रदान करूनही पेन्शनचा लाभ न मिळणाऱ्या शिक्षकांची विभागात ८०० ते ८५० असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी संघटनेसमोर पेन्शनच्या थकबाकीचे पाच समान हप्त्यात जमा करण्याचे आदेश दिले. संगणक प्रणाली लवकरच उपलब्ध होण्यासाठी आयटी विभागाशी चर्चा केली. ही सर्व प्रकरणे ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढून वाढीव पेन्शन खात्यात जमा करण्याबाबत आश्वस्त केले. शिष्टमंडळात प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, मोहन परसोडकर, अरुण नवरे, पितांबर गायधने, अरुण किरफाडे, अतुल ठाकरे आदींचा समावेश होता.
पेन्शनर्सना पेन्शनची थकबाकी पाच समान हप्त्यात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 9:01 PM