नागपूर : घरेलू कामगारांना पेन्शन उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे सुुरू असलेले पेन्शन आंदोलन अभियान आता वॉर्ड आणि तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे, यासंबंधीचा निर्णय विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.म्युर मेमोरियल हॉस्पिटल परिसरातील सभागृहात बुधवारी दुपारी विदर्भ मोलकरीण संघटनेच्या प्रमुख महिला कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रुपाताई कुळकर्णी आणि सचिव विलास भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते. घरेलु कामगारांना दरमहा पेन्शन मिळावी, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आले आहे. या मागणीसाठी संघटनेच्यावतीने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पेन्शन दौड काढण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामध्ये हजारावर मोलकरणी सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात वृद्ध मोलकरणी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात महिलांनी स्वत:ला अटक सुद्धा करवून घेतली होती, हे विशेष. शासन दरबारी पेन्शनची मागणी सातत्याने लावून धरावी लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आंदोलनाला गती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पेन्शन आंदोलन अभियान आता वॉर्ड स्तरावर आणि तालुकास्तरावर पोहोचवण्याची गरज असल्याचे डॉ. रुपा कुळकर्णी आणि विलास भोंगाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. यानंतर यासंबंधीचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. यानंतर घरेलू कामगारांना पेन्शनची गरज का आहे व शासनाने ती का उपलब्ध करून द्यावी, यासंबंधी संघटनेची भूमिका वॉर्डावॉर्डात जाऊन आणि तालुका स्तरावर कार्यक्रमांद्वारे घरेलू कामगार व मोलकरणींना पटवून दिली जाईल, यातून एक मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे भोंगाडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पेन्शन आंदोलन अभियान तालुकास्तरावर
By admin | Published: March 19, 2015 2:36 AM