नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लावलेल्या कडक लॉकडाऊनने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता मॉलही बंद झाले आहेत, पुढे किराणा दुकानेही बंद होण्याच्या भीतीने लोकांनी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी किराणा दुकानात सामानाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बाजारात चित्र होते. किराणा दुकानातून कोरोना पसरत नाही का, असा सवाल करीत अन्य दुकानदारांनी, कोरोनाचा संसर्ग वाढविणारी किराणा दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे.
गेल्यावर्षीही केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले, तेव्हाही लोकांची गर्दी झाल्याने किराणा दुकाने रात्रीपर्यंत सुरू असल्याचा अनुभव सर्वांनाच आला होता. तेव्हा एरवीपेक्षा २० ते ३० टक्के जास्त गर्दी झाली होती. धान्यासह किराणा वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या होत्या. तेव्हा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांना बोलवावे लागले होते.
एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी लागणाऱ्या डाळी, तांदूळ, मसाले तयार करण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र ५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना ही खरेदीच करता आली नव्हती. नागरिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने घराजवळ सामान उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी आता वाजवीपेक्षा जास्त किमतीत माल विकणे सुरू केले आहे. वाढत्या दराने सामानाची खरेदी करण्यापेक्षा दोन-तीन महिन्यांचे सामान आगाऊ खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. इतवारी मार्केटमधील किराणा दुकानात घाऊक दराने किराणा सामान मिळत असल्याने मोठ्या खरेदीसाठी नागपूरकर येथे नेहमीच गर्दी करतात. मात्र बुधवारीच दुकानात अलोट गर्दी उसळली होती. यामुळे सुरक्षित अंतर, मास्क यासारख्या नियमांना नागरिकांकडून हरताळ फासण्यात आला.