निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती म्हणून श्वानाव्यतिरिक्त चिमणीची गणना केली जाते. अंटार्टिक वगळता जिथे-जिथे मानवी अस्तित्व आहे, तिथे चिमणीचे वास्तव्य आहे. अगदी ११,००० वर्षांपूर्वीपासून हा चिमुकला जीव माणसांच्या साेबत असल्याचे पुरावे संशाेधनातून पुढे आले आहेत. म्हणजे माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.
१७व्या शतकात चीनमध्ये व १९व्या शतकात इंग्लंड व युराेपीय देशात चिमण्यांची संख्या ६० ते ७० टक्के घटल्याचे आढळले. काही दशकांत भारतामध्येही संख्या कमी झाली आहे, असे असले तरी ही प्रजाती पक्ष्यांमध्ये सर्वांत प्रबळ असल्याचे म्हटले जाते. कारण सर्वांत हुशार माणसांसाेबत राहणे इतर पक्ष्यांना जमले नाही, ते चिमणीने करून दाखविले.
मानवी परिवर्तनाशी थेट संबंध
राॅयल साेसायटी लंडनचे २०१८चे नवे संशाेधन, तसेच नार्वे, इराण, कझाकिस्तानच्या संशाेधकांनी जिनाेम सिक्वेन्सिंगच्या आधारे ११ हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करायला लागला, तेव्हापासून चिमणी त्याच्यासाेबत असल्याचे स्पष्ट केले आहे.बेथलहेममधील गुहेतील जीवाश्म पुराव्याच्या आधारे ४ लाख वर्षांपूर्वी चिमणीचे अस्तित्व माणसांसाेबत हाेते, असेही स्पष्ट केले आहे.
बोगनवेल हे चिऊताईचे नवे घर!
पुणे : शहरीकरणामुळे चिमण्या कमी झाल्याची ओरड होते. मात्र, चिमण्या कमी झाल्या नसून अधिवास कमी झाला आहे. त्या आता बोगनवेलींचा शोध घेऊन त्यामध्ये आपले घर थाटताना दिसत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ जैवविविधता संशोधक डॉ. हेमंत घाटे यांनी नोंदविले. बोगनवेल असेल तिथे चिमण्या भरपूर पाहायला मिळतात. सर्वत्र सिमेंटच्या इमारतींमुळे चिमण्यांना जागाच राहिली नाही; पण चिमण्यांनी आता नवीन बदलामुळे स्वत:ला राहण्यासाठी सामावून घेतले आहे, असे ते सांगतात.
का घटतेय संख्या?
- टेलिकाॅम टाॅवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम हाेतो, असे संशोधन आहे.
- जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली.
- काही दशकांत अन्नासाठी चिमणीसाेबत भाेवरी, मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून ते प्रबळ ठरत आहेत.
- माेठी शहरे साेडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावांकडे वळविला आहे.