नागपूर : भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम, वेस्टर्न कोल फील्ड व सीआरसी केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २०० ते २५० दिव्यांगजनांना कृत्रिम साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यासाठी यशवंत स्टेडियम येथील सीआरसी केंद्रावर दिव्यांगजनांची नोंदणी व मोजमाप करण्यासाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या पहिल्या टप्प्यात विविध प्रवर्गातील दिव्यांगांना लागणाऱ्या साहित्यासाठी मोजमाप करण्यात येत आहे. यामध्ये अस्थिव्यंग, दृष्टिबाधित, कर्णबधिर दिव्यांगजनांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी वेकोलितर्फे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सीआरसी नागपूर केंद्राची टीम, भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगमच्या तज्ज्ञांचे पथक मोजमाप करीत आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगजनांनी घ्यावा, असे आवाहन वेकोलिच्या सीएसआर विभागाचे प्रमुख राममोहन राव, सीएसआर मॅनेजर श्रीराम कुमार, शेखर रॉयप्रोलू, भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगमचे समन्वयक कमलेश यादव व सीआरसी केंद्राचे निदेशक डॉ. प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.