स्मार्ट सिटीत काम करणाऱ्या मजुरांची व्यथा : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण मंगेश व्यवहारे नागपूर पाण्याला धर्म मानणारा देश आपला. तहानलेल्याला घोटभर पाणी देणे, हे आपल्या येथे पुण्याचे काम समजले जाते. परंतु बदलत्या काळासोबत ही पुण्याची भावनाही बदलत चालल्याची प्रचिती आपल्या नागपुरातही यायला लागली आहे. शहराला स्मार्ट करण्यासाठी शरीर होरपळून टाकणाऱ्या या प्रखर उन्हात सध्या शेकडो मजूर राबत आहेत. परंतु श्रीमंतांच्या या वस्तीला आपल्या परिश्रमाने सजवणारे हे मजूर घोटभर पाण्यालाही महाग झाले आहेत. या मजुरांची अर्धनग्न लेकरे पाण्यासाठी दारोदार भटकत असताना एसी, कूलरच्या गारव्यात वामकुक्षी घेणारे कुणीही दार उघडून त्यांना दोन घोट पाणी द्यायला तयार नाही. नागपूर शहराला स्मार्ट सिटीचा लूक देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शहरभर भरपूर विकास कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने नागपुरात आले आहेत. ४३ डिग्री तापमानात त्यांची अंगमेहनत सुरू आहे. अशात घशाला कोरड पडली की ते पाणी शोधतात, पण प्यायला पाणी मिळत नाही. एखाद्याने दिलेच तर चेहऱ्यावर त्रासिक भाव असतात. त्याचा तो त्रासिक चेहरा पाहून पुन्हा त्याच्या दारात जाण्याला या मजुरांचा स्वाभिमान परवानगी देत नाही. अबोल प्राणी-पक्ष्यांसाठी आपल्या अंगणात पाणी ठेवा, असे सोशल मीडियावर आवाहन करणाऱ्या आपल्या सभोवतालच्या तथाकथित समाजसेवकांना या बोलक्या मानवप्राण्यांची तहान कशी जाणवत नसेल, प्रश्नच आहे. हे सर्व मजूर शहरातील अनेक भागात रस्त्याचे सिमेंटीकरण, मेट्रोचे, फायबर आॅप्टिकसाठी नाल्या खोदण्याचे काम करीत आहेत. यातील बहुतांश मजूर हे परराज्यातील आहेत. अंगमेहनतीचे काम करीत असताना त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा बरसतात, घशाला कोरड पडते; पण फ्लॅट्स, बंगल्यांची दारे कडेकोट लागलेली. पिण्याचे पाणी मागायला जायचे तर कुठे, असा प्रश्न मजुरांना त्रस्त करीत आहे. कि मान एवढे करा नागपूरच्या विकासात आपला घाम ओतत असताना, नागपूरकरांना त्यांची व्यथा समजायला हवी. अनेकजण पशुपक्ष्यांसाठी जसे घराबाहेर पाण्याची सोय करतात. तशीच काहीशी सोय ज्या भागात मजुरांचे काम सुरू आहे, तिथे उपलब्ध करून द्यावी. त्यांना फ्रीजचे गार पाणी नको. तहान भागविण्यासाठी सार्वजनिक नळाचे पाणीसुद्धा त्यांना चालेल. अंगमेहनतीमुळे त्यांच्या गळ्याची कोरड सुटावी, त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांची पाण्यासाठी ओरड थांबावी, एवढीच अपेक्षा.
श्रीमंतांच्या वस्तीत मजुरांना मिळेना घोटभर पाणी
By admin | Published: April 13, 2017 2:57 AM