लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमणाचा कहर सगळ्यांनीच अनुभवला आहे. तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी म्हणा, संकेतही दिले जात आहेत. मात्र, या धास्तीची, कोरोना प्रोटोकॉलची आणि घ्यावयाच्या काळजीची टर उडवताना बहुतांश नागरिक दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात घरादारात प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर असलेले मास्क आता गायब झाले आहेत. मास्क न वापरण्याची कारणेही मजेदार आहेत. सगळेच बिनधास्त वावरताना दिसतात. जणू कोरोना नावाच्या विषाणूचे निर्दालन झाल्याचीच भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात
महाल, इतवारी - महाल ही शहरातील सर्वात जुनी बाजारपेठ आहे, तर नजीकच मध्य भारताची कुबेरपेठ म्हणून ओळखला जाणारा इतवारी बाजार आहे. बाजारपेठा अनलॉक झाल्यापासून ग्राहकांनी ही पेठ खुलून उठली आहे. येथे येणाऱ्या एखाद् दुसऱ्या ग्राहकाच्याच चेहऱ्यावर मास्क दिसतो. इतर सर्व ग्राहक बिनधास्त फिरताना दिसतात. विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही मास्क अभावानेच दिसतो. सॅनिटायझरचा वापर तर जवळपास संपुष्टातच आल्याची स्थिती आहे.
सीताबर्डी - ही शहरातील सर्वात व्यस्त अशी बाजारपेठ आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते आलिशान पॉश दुकानांची येथे गर्दी आहे. काय हवे ते सर्व या बाजारपेठेत मिळते. त्यामुळे, शहरातील दूरवरून येणाऱ्या ग्राहकांची संख्याही येथे मोठी आहे. फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडतो, याचे उदाहरण बघायचेच झाले, तर सीताबर्डी बाजारपेठेशिवाय दुसरे ठिकाण नाही. मास्क, सॅनिटायझर, कशाचाच इथे वापर होताना दिसत नाही.
सक्करदरा - सक्करदरा बाजारपेठेत सोमवारी पेठेतील नित्य भरणारा भाजीबाजार, तिरंगा चौक येथील चहा-नाश्त्याचे ठेले आणि कापड, किराणा दुकानदार सर्व आहेत. सकाळपासून ते उत्तररात्रीपर्यंत ही बाजारपेठ ग्राहकांनी फुल्ल असते. येथे येणाऱ्या शंभरातील दहा जणांच्या चेहऱ्यावरच मास्क दिसून येतो.
कारवाईचा ससेमिरा झाला कमी
लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकेच्या कोविड पथकाकडून नागरिकांवर टेहळणी ठेवली जात होती. प्रथम ५०० रुपये आणि नंतर एक हजार रुपयाचा दंडही ठोठावण्यात येत होता. अनलॉक झाल्यापासून मात्र कारवाई थंडावल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे आता नागरिकही कंटाळले असून, पथकाला प्रत्युत्तर द्यायला लागले आहेत. अनेक सभागृहातील सोहळ्यांमध्ये कारवाईचा इशारा दिल्यावरही आयोजकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. लोक ऐकत नाहीत, तर आम्ही काय करू, असे उत्तर आयोजकांकडून पथकातील सदस्यांना दिले जाते.
श्वास घ्यायला होतो त्रास
आता हिवाळ्याचे दिवस आहेत. गारठा वाढतो आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर मास्क असला, तर श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून मी मास्क वापरत नाही. कारवाई होऊ नये म्हणून मास्क चेहऱ्यावर टांगलेला असतो.
- एक तरुण
कुणीच वापरत नाही, तर मीच कशाला?
मी मास्क बाळगते. पण, बाहेर कुणीच मास्क वापरताना दिसत नाही. म्हणून मी सुद्धा वापरत नाही. शिवाय, मास्कमुळे कान दुखायला लागले आहेत. पर्समध्ये मास्क ठेवते. विचारणा झालीच तर लगेच मास्क काढते.
- एक तरुणी
चष्म्यावर वाफ जमा होते
माझे वय ६९ आहे आणि चष्म्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. हिवाळ्याचे दिवस असल्याने तोंडातून वाफ निघत असते. मास्कमुळे ती वाफ चष्म्यावर येते. हा त्रास सतत असतो. म्हणून मास्क वापरणे टाळतो. पोलिसांनी हटकल्यावर त्यांना हेच कारण सांगतो.
- एक ज्येष्ठ नागरिक