नागपूर, दि. 9 - भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य यांनी केले. आॅगस्ट क्रांती दिनाचा मुहूर्त साधून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनाचा शंखनाद झाला. यावेळी ते बोलत होते. मानस चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ चिनी वस्तूंची होळी करून बहिष्कार आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अजय पत्की, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक पवन श्रीवास्तव, राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, राष्ट्रीय महामंत्री प्रदीप नागपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. चीनने केलेले आर्थिक आक्रमण परतवून लावण्याची जनतेचीदेखील जबाबदारी आहे. सध्या चीनविरोधात जे वातावरण निर्माण झाले आहे, ते सरकारसाठीदेखील साहाय्यकारक आहे. मात्र चीनला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर अगोदर तेथील नेते व नागरिकांची मानसकिता, संस्कृती, मनोविज्ञान इत्यादींचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. पोखरण स्फोटांनंतर अमेरिकेने भारताचा अभ्यास करण्यासाठी विशेष संस्था स्थापन केली होती. त्याच धर्तीवर भारतानेदेखील ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर चायनीज स्टडीज्’ सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. राममंदिराच्या मुद्यावर गोविंदाचार्य यांनी भाष्य केले. राममंदिर बनावे ही देशातील जनतेची भावना आहे व तो श्रद्धेशी जुळलेला विषय आहे. याबाबत संवाद, कायदा यांचा आधार घेऊन केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. गोहत्याबंदी व राममंदिर या मुद्यांवर सरकार सत्तेत आले. आता जनादेशाचा कौल लक्षात घेत यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचीदेखील तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.केंद्राबाबत सावध भुमिका... एकेकाळी भाजपात असलेल्या गोविंदाचार्य यांनी नोटाबंदीनंतर केंद्र शासनावर टीकेची तोफ डागली होती. मात्र चीनच्या मुद्यावर त्यांनी सावध पवित्रा घेतला. डोकलाम मुद्यावर केंद्र शासनाची भूमिका संतुलित आहे असे ते म्हणाले. नोटाबंदीच्या वेळी केंद्राची योग्य तयारी नव्हती. मात्र जीएसटीसंदर्भात एक ठोस भूमिका रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चीनविरोधात जनतेने आर्थिक युद्ध लढावे - गोविंदाचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 8:40 PM