कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुती सरकारचा पहाटेचा शपथ विधी २३ नोव्हेंबरला झाला होता. यावेळी विधानसभेचा निकालही २३ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे भाजपच्या फोडा फोडीच्या राजकारणाचा हिशोब जनता व्याजासकट चुकता करेल, असा टोला उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलता अंधारे म्हणाल्या, जागा वाटपाची बोलणी अनिल देसाई आणि संजय राऊत करत आहेत. काही जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यात पारनेर, हडपसर आहे. कुटुंबातील लहान बहीन म्हणून सांगते, दोन पाऊल आम्ही मागे जातो, दोन पाऊल तुम्हीही मागे घ्या. किमान बैठकीला बसून रहा, निघून गेले तर चर्चा कशी होईल, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले. मी निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे, अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो. मशाल पेटवण्यासाठी मदत करू असे बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्यासमोर तशी भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामटेकसाठी आम्ही मोठं मन केले- लोकसभेच्या वेली आम्ही रामटेकची जागा काँग्रेससाठी सोडली. त्यावेळी खासदार आमच्या पक्षाचे होते. पण मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही ते स्वीकारले. आम्ही प्रचार सुद्धा केला, असे सांगत विधानसभेत मात्र रामटेकसाठी उद्धव सेना आग्रही असल्याचे संकेत त्यांनी दिले. कॉंग्रेस उमेदवाराचा सांगलीतला अनुभव हा वेदनादायी आहे. तो विसरणे कठीण आहे, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
फडणवीस यांची जागा धोक्यात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात आहे. महाराष्ट्र भाजपच्या मालकाची सीट धोक्यात असल्याचे अनेक सर्व्हे सांगत सांगत आहेत, असा दावा करीत आमच्या वाट्याला दक्षिण पश्चिम आली तर आम्ही लढू, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.