नागपूर : अनाचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेंचे सरकार आपण पाहिले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले. कोविडच्या बॅगमध्येही घोटाळा केला. त्यांनी अडीच वर्ष जसा आराम केला तसा परमनंट आराम करण्याकरता महाराष्ट्रातील लोक सांगणार आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका करावी एवढी उंची उद्धव ठाकरेंची नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
नागपूर जिल्ह्यात वडोदा येथे भाजपाच्या गाव चलो अभियानात सहभागी होत असताना ते माध्यमांशी बोलत होते. येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचा संसदेत एक खासदार आणि विधिमंडळात दोन-चार आमदार देखील दिसणार नाही. मुंबई महापालिकेत त्यांचे कोणतेही अस्तित्व जाणवणार नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. पक्ष गेला, लोक गेले, माणसे गेलीत. त्यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान सूर्यकांत दळवी यांचा भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पारडसिंगा दौऱ्यात उबाठाचा जिल्हाध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले. याची मिरची लागल्याने त्याची हकालपट्टी केली. आता राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करण्यात कोणताही अर्थ नाही. खरे तर ठाकरेंच्या काळात कोविडमध्ये भ्रष्टाचार केला. त्यांनी तर मृताच्या बॅगमधील पैसे खाल्ले. त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे होती, असेही बावनकुळे म्हणाले.