लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेले मतदान हे काही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी झालेले मतदान नव्हतं. मुस्लीम आणि दलितांनी जे एकगठ्ठा मतदान केले ते मोदी-शहा यांच्या विरोधात होते. त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. या गलिच्छ राजकारणाला लोक विसरलेले नाहीत. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तेच या महाराष्ट्रात झालेय, अशी परिस्थिती गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघितली नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील, असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केला.
राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शनिवारी रविभवन येथे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येत नाही. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार आहोत. राज्यात या दोन्ही आघाडीच्या विरोधात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करू.
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार हेच जबाबदार आहेत. हे मी याआधी पण माझ्या जाहीर सभेतून बोललो आहे. कारण या प्रकारच्या राजकारणाला शरद पवारांनीच महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यानंतर जातीचे विष देखील राज्यात शरद पवारांनीच कालवलं. महापुरुषांची विभागणी कधीही जातीपातीत झाली नव्हती. आमचे संत कधी आडनावांनी ओळखले जात नव्हते. संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितले जात होते. पण या सर्व गोष्टीची सुरूवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच राज्यात सुरु झाल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली.
पोलिसांना फ्री सोडा सर्व व्यवस्थित होईल राज्यातील गुन्हेगारीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, जितकी माहिती पोलिसांना असते तितकी माहिती कुणालाही नसते. गृहमंत्र्यांना सुद्धा नसते. परंतु पोलिसांवर नेहमीच दबाव टाकला जातो. पोलिसांना त्यांच्या कामासाठी फ्री सोडून बघा सर्व काही सुरळीत होईल, असे राज ठाकरे म्हणाले.
बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. या आरोपींना ठेचलंच पाहिजे. आज बंद पुकारला. महाविकास आघाडीच्या काळातही हे गुन्हे हाेत होते. तेव्हा का नाही थांबवले. बदलापूरनंतर सातत्यानं अशा घटना उघडकीस येत आहे, त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का?” असा सवालही राज ठाकरे यांनी केला.