खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:17 AM2023-07-05T11:17:58+5:302023-07-05T11:29:27+5:30
राज्यातील सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नागपूर : राज्यात आलेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले व लोकांच्या कल्पनाविस्ताराला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे गावांच्या नावासमोर खुर्द व बुद्रुक असे लिहिले जाते; तसेच राज्यात उपमुख्यमंत्री (खुर्द) व उपमुख्यमंत्री (बुद्रुक) अशी दोन पदे आहेत की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.
रविवारी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट घेऊन अजित पवार सत्तेत सहभागी झाले. दरम्यान, राज्यातील या सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले असून आता त्यावरुन नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. खुर्द व बुद्रुक अशी दोन पदे असल्याचे म्हणत कोपरखळ्याही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या भूकंपानंतर लगेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पदग्रहणानंतरच्या पहिल्या विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागताला राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. मात्र राजकीय रणधुमाळीचे केंद्रबिंदू असलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र स्वागताला कुठेही दिसले नाहीत. राजकीय बेरीज-वजाबाकी करण्यात व्यस्त असल्याने त्यांना राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी येता आले नाही की इतर काही व्यस्तता होती, असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र नागपूरला न आलेल्या पवार यांना आता उपमुख्यमंत्री (खुर्द) म्हणायचे की उपमुख्यमंत्री (बुद्रुक), हीच खरी चर्चा विमानतळावर उपस्थितांमध्ये रंगली होती.