जितेंद्र ढवळे
नागपूर : कोरोना व्हॅक्सीनच्या संशोधन जगातील चार महिलांचा मोठा वाटा आहे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे ग्रा.पं.च्या निवडणुकीतही महिला मागे राहण्याचा प्रश्नच नाही. नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १३० ग्रा.पं.साठी १४८५ महिला उमेदवारांनी रणशिंग फुंकले आहे. यातील हक्काच्या ५९१ (५० टक्के आरक्षित) जागावर महिला निवडून येतीलच. यासोबतच सर्वसाधारण गटातून ७९० महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने यावेळीही ग्रा.पं.मध्ये ‘होम मिनिस्टर’ (महिलांचा) टक्का अधिक असणार आहे.
जिल्ह्यात ४२६ वॉर्डातील ११८१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित १२८ ग्रा.पं.साठी प्रचाराचा धुराळा उडाला आहे. जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. यात १४८५ महिला तर १३१३ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. तालुकानिहाय महिला उमेदवारांचा विचार करता कुही तालुक्यातील २५ ग्रा.पं.साठी २३९ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात आरक्षित संवर्गातून १११ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या ग्रा.पं.च्या ७८ वॉर्डातील २१५ जागांसाठी निवडणूक होत आहे. कुही पाठोपाठ १७ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातलेल्या नरखेड तालुक्याचा नंबर लागतो. येथे १७ ग्रा.पं.च्या ५५ वॉर्डातील १४७ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे एकूण १६९ महिला रिंगणात आहे. या तालुक्यात आरक्षित संवर्गात महिला उमेदवारांची संख्या ७१ इतकी आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघातील ग्रा.पं.मध्येही ‘होम मिनिस्टर’ची (महिलांची) भूमिका महत्त्वाची राहणार असणार आहे. जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या इतर तालुक्याचा विचार करता काटोलमध्ये ३ ग्रा.पं.च्या २३ जागांसाठी ३०, सावनेर तालुक्यातील १२ ग्रा.पं.च्या ११० जागांसाठी १२९, कळमेश्वर तालुक्यातील ५ ग्रा.पं.च्या ४७ जागांसाठी ५९, रामटेक तालुक्यातील ९ ग्रा.पं.च्या ९१ जागांसाठी ११०, पारशिवनी तालुक्यातील १० ग्रा.पं.च्या ८४ जागांसाठी १०८, मौदा तालुक्यातील ७ ग्रा.पं.च्या ६३ जागांसाठी ७९, कामठी तालुक्यातील ०९ ग्रा.पं.च्या ८७ जागांसाठी १११, उमरेड तालुक्यातील १४ ग्रा.पं.च्या ११६ जागांसाठी १३५, भिवापूर तालुक्यातील ३ ग्रा.पं.च्या २७ जागांसाठी ३६, नागपूर ग्रामीण तालुक्यातील ११ ग्रा.पं.च्या १३५ जागांसाठी २०६ तर हिंगणा तालुक्यातील ५ ग्रा.पं.च्या ३६ जागांसाठी ७४ महिला उमेदवार रिंगणात आहे. या सर्व तालुक्यात आरक्षित संवर्गातून महिलांना हक्काचा वाटा मिळेलच. मात्र सर्वसाधारण गटातही महिलांची दावेदारी अधिक असल्याने ग्रा.प.च्या कारभारात ‘होम मिनिस्टर’ची चलती अधिक असणार, हे निश्चितच.
ग्रा.पं.च्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होईल. यातही महिलांना हक्काचा वाटा मिळेल. मात्र प्रत्येक ग्रा.पं.मध्ये महिला सदस्यांची संख्या अधिक राहणार असल्याने सत्तेच्या चाव्या या अखेरपर्यंत महिलाकडेच असतील, हे मात्र वास्तव आहे.
कुहीत सर्वाधिक महिला उमेदवार
जिल्ह्यात कुही तालुक्यात सर्वाधिक २५ ग्रा.पं.साठी निवडणूक होत आहे. येथे ग्रा.पं.च्या २१५ जागांसाठी ४६२ उमेदवार रिंगणात आहेत. यात २३९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या तालुक्यात अनूसुचित जाती संवर्गातून ५०, अनूसूचित जमाती संवर्गातून ०७, नामाप्र संवर्गातून ५४ तर सर्वसाधारण गटातून १२८ महिला उमेदवार ग्रा.पं.च्या आखाड्यासाठी सज्ज आहेत.
१३० ग्रा.पं.मध्ये ५९१ जागा आरक्षित
जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १३० ग्रा.पं.च्या ११८१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महिलांचे आरक्षण ५० टक्के म्हणजे ५९१ जागा इतके आहे. यासाठी अनुसूचित जाती संवर्गातून २२२, अनुसूचित जमाती संवर्गातून १३५ तर नामाप्र संवर्गातून ३३८ महिला उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.
काटोल ३०
नरखेड १६९
सावनेर १२९
कळमेश्वर ५९
रामटेक ११०
पारशिवनी १०८
मौदा ७९
कामठी १११
उमरेड १३५
भिवापूर ३६
कुही २३९
नागपूर (ग्रा.) २०६
हिंगणा ७४