सावनेर/काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/रामटेक/ हिंगणा/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी मृत्यूची संख्या अद्यापही जास्त आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १३ तालुक्यात २,०३९ नवीन रुग्णांची भर पडली आणि २४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२६,५४३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी २,७५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आता बरे होणाऱ्यांची संख्या ९६,१६७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८,२७६ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १३४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ११३ रुग्णांचा समावेश आहे. चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन तर पाटणसावंगी आरोग्य केंद्रांतर्गत एका रुग्णाचा मृत्यू झाला.
काटोल तालुक्यात ३२७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १७ तर ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारीसावंगा केंद्रांतर्गत २, कोंढाळी केंद्रांतर्गत (२३) तर येनवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ रुग्णांची नोंद झाली. नरखेड तालुक्यात ९१ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २० तर ग्रामीण भागातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९२६ तर शहरात ४२४ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (२१), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (३५) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात १५ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ९४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४५ तसेच ग्रामीण भागातील ४९ जणांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात ५६ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील २ तर ग्रामीणमधील ५४ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,२४८ रुग्णांची नोंद झाली. यातील ४,८२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३९९ इतकी आहे. कुही तालुक्यात २७९ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात मांढळ येथे एक तर वेलतूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४७९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी न.प. क्षेत्रात सर्वाधिक २१ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १०,९३७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८,६०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तालुक्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
कळमेश्वरात पुन्हा रुग्णवाढ
कळमेश्वर तालुक्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात ११८ नवीन रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील ६१ तर ग्रामीण भागातील ५७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा येथे सर्वाधिक १० रुग्णांची नोंद झाली.