जिह्यातील एकूण कोविड सेंटर - ७
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड/ भिवापूर/ पारशिवणी/काटोल : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा टक्का घसरतोय. पर्याप्त आरोग्य सुविधा नसल्याने जनतेच्या आक्रोशानंतर जिल्ह्यात तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर उभारल्या गेले. जिल्ह्यात ७ कोविड केअर सेंटर आहेत. येथे रुग्णांसाठी चहा-नाश्ता व दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे काम नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेकडे सोपविले गेले आहे. सदर संस्था ‘पेटी कंत्राट’ पद्धतीने या संपूर्ण आहार व्यवस्थेचे नियोजन करीत आहे. पेटी कंत्राट म्हटले की, निश्चितच क्वॉॅलिटीवर परिणाम पडत असतो. तसा परिणाम कोविड सेंटरच्या भोजनव्यवस्थेवर पडू नये, अशी बाब सतीश चौधरी यांनी व्यक्त केली. सकाळी चहा-नाष्टा त्यानंतर दुपारचे आणि सायंकाळचे जेवण अशी व्यवस्था कोविड सेंटरमध्ये केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला ३० मार्च २०२१ च्या पत्रानुसार कंत्राट देण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नागपूर यांच्या आदेशानुसार प्रति रुग्ण १६० रुपये प्रति दिवस अधिक ५ टक्के जीएसटीप्रमाणे आहाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नाशिकच्या एकाच संस्थेला संपूर्ण कंत्राट सोपविण्याऐवजी त्याच दराने प्रत्येक तालुका पातळीवर स्थानिक संस्थेला वा बचत गटांना ही जबाबदारी का सोपविल्या गेली नाही, असा सवाल विचारला जात आहे.
उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये
रुग्णांना आहारासोबत दूधही
उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये सध्या १७ रुग्ण औषधोपचार घेत आहेत. यापैकी १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांशी चर्चा केली असता, आहार सकस आणि वेळेत मिळत असल्याचे सांगितले. सोबतच रणधीरसिंह भदोरिया मित्र मंचच्या माध्यमातून आम्हास दररोज दूधसुद्धा मिळत असल्याची बाब रुग्णांनी व्यक्त केली.
गरमागरम चहा, नाष्टा
आणि वेळेत पौष्टिक जेवण
भिवापूरच्या कोविड केअर सेंटरमधील दाखल रुग्णांना चहा, नाष्ट्यासह वेळेत पौष्टिक जेवण दिले जात आहे. याचा चांगला परिणाम रुग्णांच्या सुदृढ आरोग्यावर होत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये वितरित होणाऱ्या आहारासंदर्भात शहरातील तीन व ग्रामीणमधील एका रुग्णाशी संवाद साधला. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असताना, योग प्राणायामासह सकाळी गरमागरम चहा, त्यानंतर दररोज सकाळी ८ वाजता वेगवेगळा प्रकारचा पौष्टिक नाश्ता यात ढोकळा, इडली, उकमा, पोहे आदींचा समावेश असतो. दुपारी ११ वाजता व रात्री ८ वाजता पौष्टिक जेवण दिलेे जात होते. यात वरण, भात, पत्ता कोबी, फुलकोबी, वांगे भाजी, पालेभाज्यासह प्रत्येकाला पाच पोळ्या दिल्या जातात. अधिकची पोळी किंवा इतर अन्न मागितल्यास मिळते. १४ दिवसांच्या काळात कोविड सेंटरमध्ये घरगुती पद्धतीचे चांगले जेवण मिळाल्याचा अनुभव या रुग्णांनी सांगितला. शिवाय सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंडी व फळेसुद्धा मिळत होती.
पारशिवणीत घरघुती जेवण
अन् आस्थेने विचारपूस
पारशिवणी येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना जेवणाची उत्तम सोय शासनाच्या वतीने करून देण्यात आली आहे. येथील रुग्णांना सकाळी ८ वाजता चहा देण्यात येतो. त्यानंतर १०.३० च्या दरम्यान जेवण देण्यात येते. जेवणाचे कंत्राट स्थानिक युवकाला देण्यात आल्यामुळे तो घरघुती जेवण पुरवितो. या सेंटरवर वेळेत जेवण मिळत असल्याची माहिती येथून बरी होऊन गेलेल्या पेंच परिसरातील एका वृद्ध महिलेने दिली. सकाळच्या जेवणानंतर दुपारी ४ ते ४.३० च्या दरम्यान चहा मिळत होता. रात्रीला ८ वाजता रात्रीचे जेवण मिळाले, असेही सांगितले.
-
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला औषधोपचारासह पौष्टिक आहार महत्त्वाचा असतो. याकडे आम्ही विशेष लक्ष देतो. रुग्णास चहा, नाश्ता व जेवण गरमागरम मिळावे. यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक दिवशी नाश्ता व भाजीमध्ये बदल असावा. शिवाय ते पौष्टिक असावे. हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे.
- डॉ. कल्याणी बारसाकडे
कोविड केअर सेंटर, भिवापूर
-
कोविड रुग्णांसाठी आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही याकडे जाणिवेने लक्ष देतो. आहार योग्यवेळी आणि उत्तम मिळावा, याकडेही डॉक्टरांचे विशेष लक्ष असते. कोविड आहार सुविधेचे कंत्राट जिल्हा स्तरावरून देण्यात आले आहे.
- डॉ. एस.एन. खानम
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उमरेड
कोरोनाबधित रुग्णांना पोषक आहार महत्त्वाचा असतो. या कोविड सेंटर याची विशेष काळजी घेतली जाते. पालेभाज्याचा समावेश आहारात असतोच सोबतच इतर घटकतत्त्वे नाश्त्यातून पुरविली जातात. रुग्णांना थोडा व्यायाम करण्याचा देखील सल्ला देण्यात येतो.
-डॉ. प्रशांत बर्वे,
समन्वक, कोविड सेंटर, पारशिवणी