हेरिटेज कस्तुरचंद पार्क मधील छत्रीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 07:49 PM2020-09-07T19:49:32+5:302020-09-07T19:51:22+5:30
बई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. हे हेरिटेज तातडीने पूर्वस्थितीत यावे ही न्यायालयाची अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायालयाने सोमवारी पार्कमधील छत्री व इतर जुन्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा प्रशासनाला आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. हे हेरिटेज तातडीने पूर्वस्थितीत यावे ही न्यायालयाची अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायालयाने सोमवारी पार्कमधील छत्री व इतर जुन्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा प्रशासनाला आदेश दिला. तसेच, मैदानाचे समतलीकरण करण्यास सांगितले. हे मैदान खेळण्यायोग्य व्हायला हवे, असे मत आदेशात व्यक्त करण्यात आले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. ती याचिका तेव्हापासून प्रलंबित आहे. दरम्यान, या दोन्ही न्यायमूर्तींनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता कस्तुरचंद पार्कला स्वत: भेट देऊन दुरवस्थेची पाहणी केली. त्या आधारावर हे आदेश जारी करण्यात आले. प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांना हे मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी काय करता येईल यावर प्रभावी सूचना सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. प्रकरणावर आता २१ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. महानगरपालिकेतर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.
अशी झाली दुरवस्था
१ - विकासकामे व जड वाहनांमुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
२ - मैदानावर ठिकठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. कचरा साचला आहे.
३ - मैदानावरील छत्रीचे बांधकाम दिवसेंदिवस कमकुवत होत आहे.
४ - मैदानाच्या दुरवस्थेमुळे खेळ बंद झाले आहेत.