लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खादी ग्रामोद्योगच्या ‘स्फूर्ती’ योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये रोजगारनिर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याप्रमाणे आर्थिक अंकेक्षण केले जाते, त्याचप्रमाणे या योजनेत काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कामगिरीचेदेखील अंकेक्षण केले गेले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘स्फूर्ती’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधला.
रोजगारनिर्मितीसाठी काम करीत असताना तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. ‘स्फूर्ती’अंतर्गत येत असलेल्या सर्व योजना आणि कार्यपद्धती ‘डिजिटल’ झाल्या पाहिजे. ‘एमएसएमई’च्या प्रत्येक योजनेची कार्यपद्धती ही डिजिटल, पारदर्शक, वेळेत निर्णय देणारी, परिणामकारक आणि भ्रष्टाचारमुक्त असली पाहिजे. काम करणारी संस्था कुणाची आहे, मालक कोण आहे, याकडे लक्ष न देता, संस्थेने किती रोजगारनिर्मिती केली, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीत संस्थेचा किती सहभाग आहे, अशा पद्धतीचे मूल्यांकन करण्यात यावे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.