प्रफुल्ल गुडधे यांचा बॉम्बगोळा शहर काँग्रेसला चेहरा कुठाय ? विरोधी पक्षनेत्यांची निवड दबावातून नागपूर : मी कुठल्याही गटाचा नाही. परंतु गटातटाच्या राजकारणात नागपूर शहरातील काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे. यामुळेच महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. काँग्रेसला चांगले दिवस येण्यासाठी जनाधार नसलेल्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसमधून सक्तीची निवृत्ती द्यावी, अशी मागणी करीत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची संधी नाकारल्याने नाराज असलेल्या प्रफुल्ल गुडधे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसमधील गटबाजीवर घणाघाती टीका केली. विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठविलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली. यातील २७ नगरसेवकांनी माझ्या नावाला पाठिंबा दर्शविला. गार्गी चोपरा यांना घरी भेटायला गेलो असता, त्यांनीही मला पाठिंबा दर्शविला. परंतु शहरात जनाधार गमावलेल्या नेत्यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच मला सभागृहाचा विरोधी पक्षनेता बनता आले नाही. पण शहरातील ३० लाख लोकांचा विरोधी पक्षनेता म्हणून मी जबाबदारी स्वीकारली असल्याचे गुडधे म्हणाले.महापौर, उपमहापौर व सत्तापक्ष नेत्यांची निवड झाली. पण शहरात चर्चा होती विरोधी पक्षनेता कोण होणार याचीच. या पदासाठी मी दावेदार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले तसेच प्रत्यक्ष राजकारणात नसलेल्या लोकांचेही मला समर्थनासाठी फोन येत होते. त्या आधारावर माझा दावा प्रबळ होता, मात्र मला संधी मिळू दिली नाही. त्यामुळे पक्षपातळीवर घेण्यात आलेला निर्णय लोकांना आवडलेला नाही, असे मत त्यांनी मांडले.महापालिकेत भाजपला मिळालेले यश व शहराचे व्यापक हित विचारात घेता, विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसला संधी आहे. परंतु लोकांना विश्वासू चेहरा हवा आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभागात याचा प्रत्यय आला. विश्वासू चेहरा मिळाल्याने लोकांनी काँग्रेसचे बंटी शेळके यांना निवडून दिल्याचे गुडधे म्हणाले. (प्रतिनिधी)प्रदेश काँग्रेसवर दबाव काँग्रेसकडे विश्वासू चेहरा नसल्याने महापालिका निवडणुकीत भाजपाला विजय मिळाला. मतदारांनी काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती. परंतु प्रदेश काँग्रेसवर राजकीय दबाव आणून विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय घ्यायला भाग पाडले. काँग्रेसमधीलच काही लोक काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गुडधे यांनी केला.काही लोक काँग्रेसला खासगी मालमत्ता समजतातशहर काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणे म्हणजे कार्यकर्ता, अनुपस्थित असणारे कार्यकर्ता नाही. विकास ठाकरे हेही शहर काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापूर्वी अनुपस्थित राहात होते. त्यामुळे मी पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहत असल्याचा आरोप चुकीचा आहे. काही लोक काँग्रेसला खासगी मालमत्ता समजत असल्याचा आरोप गुडधे यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.महापालिकेत भ्रष्टाचार; उपलोकायुक्त हवाचनवनिर्वाचित महापौरांनी महापालिकेच्या पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा दावा केला आहे. परंतु मुंबईप्रमाणे नागपूर महापालिकेत गेल्या दहा वर्षांत अनेक घोटाळे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर असतानाही घोटाळे झाले. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर दरमहा ८० लाख ३८ हजार ३६८ रुपये खर्च केला जातो. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांना ४८ लाख ३३ हजारांचे वेतन दिले जाते. दरमहा ३२ लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला. महापालिकेच्या अनेक विभागात भ्रष्टाचार असल्याने मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही उपलोकायुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जनाधार नसलेल्या नेत्यांना सक्तीची निवृत्ती द्या!
By admin | Published: March 07, 2017 1:46 AM