दुसऱ्या पतीने संबंध नाकारलेल्या पत्नीला गर्भपाताची परवानगी :उच्च न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 01:09 AM2021-05-11T01:09:59+5:302021-05-11T01:11:53+5:30
High Court relief दुसऱ्या पतीने संबंध नाकारल्यामुळे मानसिक आघात झालेल्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने हा निर्णय देताना मेडिकल बोर्डचे मत विचारात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या पतीने संबंध नाकारल्यामुळे मानसिक आघात झालेल्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने हा निर्णय देताना मेडिकल बोर्डचे मत विचारात घेतले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित महिलेने ती १५ आठवड्यांची गर्भवती असताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आले. त्या बोर्डने महिलेच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून ३० एप्रिल रोजी न्यायालयात अहवाल सादर केला व रुग्णाच्या हिताकरिता गर्भपात करणे आवश्यक असल्याचे मत दिले. हा निर्णय येतपर्यंत महिलेचा गर्भ १६ आठवडे २ दिवसांचा झाला होता.
प्रकरणातील माहितीनुसार, संबंधित महिला सविता (काल्पनिक नाव) हिचे २०१५ मध्ये पहिले लग्न झाले होते. पहिला पती चांगला वागत नसल्यामुळे तिने घटस्फोटाकरिता कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती याचिका प्रलंबित आहे. २०१९ मध्ये सविताची नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या पतीची ओळख झाली. दरम्यान, दुसऱ्या पतीने सविताला बेशुद्धीचे औषध देऊन तिची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतली व तिच्यावर बळजबरी केली. तसेच, तो सविताला गप्प ठेवण्यासाठी आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यानंतर दुसऱ्या पतीने स्वत:च २३ जुलै २०२० रोजी आर्य समाज येथे सवितासोबत लग्न केले. जानेवारी-२०२१ मध्ये सविताला गर्भधारणा झाली. तिने दुसऱ्या पतीला याची माहिती दिल्यानंतर त्याने सवितासोबतचे सर्व संबंध नाकारले, तसेच तो आधीच विवाहित असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत बाळाला जन्म देणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरेल, ही बाब लक्षात घेता तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सवितातर्फे अॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली
सविताने १७ मार्च २०२१ रोजी दुसऱ्या पतीविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.