नागपूर :ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रा, दोन वर्षांपासून बंद होती. या यात्रेमध्ये गुरांचा मोठा बाजार भरतो. त्याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना होतो. महिना-महिनाभर ही यात्रा चालते. त्यामुळे तिथल्या स्थानिकांचा आर्थिक स्त्रोत वाढतो. दोन वर्षांपूर्वी कोरोना आणि यावेळी लम्पी व्हायरसमुळे या यात्रेला परवानगी मिळत नव्हती. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण या यात्रेला परवानगी दिली असल्याचे आमदार किशन काथोरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या म्हसा गावातील म्हसोबाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. या यात्रेला राज्यभरातील यात्रेकरू येत असतात. महाराष्ट्रात गुरांचा बाजार म्हणून या यात्रेत बैल व म्हशींचा बाजार भरला जातो. नामवंत बैल या यात्रेत आणले जातात. परंतु जनावरांवरील होणार्या लम्पी रोगामुळे जनावरांचा बाजार होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, पशुसंवर्धन मंत्र्यांनी यात्रा भरविण्याची विनंती मान्य करून घेतल्याने यात्राप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.