राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकापेक्षा अधिक आरोपींनी समान हेतूने एखाद्या व्यक्तीचा घातक शस्त्रांनी खून केल्यास, त्यातील प्रत्यक्ष शस्त्रहल्ला न करणारे आरोपीही या गुन्ह्यात दोषी ठरतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. (A person can be convicted of murder even if he does not carry a real weapon; The principle of equal purpose applies)वर्धा येथील वाघ्या व संदीप उके या दोन भावांनी पिंटू सोनवणे या तरुणाचा खून केला आहे. आरोपी संदीपने स्वत:चा बचाव करण्यासाठी पिंटूवर वाघ्याने गुप्तीने वार केल्याचा मुद्दा मांडून त्याला (संदीपला) खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असा दावा केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून लावला.
पिंटूवर संदीपने गुप्तीने वार केले नाही, हे खरे आहे; परंतु वाघ्याने घरून गुप्ती आणण्यापूर्वी संदीपने पिंटूला हातबुक्क्या व लाथांनी मारहाण केली. त्याची भूमिका तेथेच संपली नाही. वाघ्या गुप्ती आणेपर्यंत तो पिंटूला मारहाण करीत राहिला. त्यानंतर त्याने पिंटूला पकडून ठेवले आणि वाघ्याने गुप्तीने वार करून पिंटूचा खून केला. त्यावरून दोघांचाही पिंटूचा खून करण्याचा हेतू होता हे सिद्ध होते. त्यामुळे संदीपने प्रत्यक्ष गुप्तीने वार केले नसतानाही तो कायद्यातील समान हेतूच्या तत्त्वानुसार खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरतो, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.
न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ९ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ते अपील फेटाळून आरोपींची शिक्षा कायम ठेवली.