नागपूर : कोरोना काळात बेरियाट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी ४०० किलोपेक्षा जास्त वजनी व्यक्तीवर यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी केली आहे. रोहतक निवासी दीपक यांचा २००९ ला अपघात होऊन पाठीच्या कण्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांचे चालणे-फिरणे बंद झाल्याने वजन नियंत्रणाबाहेर जाऊन ४०० किलोपेक्षा जास्त झाले होते. सर्जरीत जास्त जोखीम असल्याच्या कारणावरून दीपकला दिल्ली, मुंबई आणि अन्य मोठ्या रुग्णालयाने सर्जरीकरिता मनाई केली होती. जास्त वजनामुळे दीपकला हरियाणा येथून इंदूरला लोडिंगमध्ये लेटून रस्ता मार्गाने आणाावे लागले. मोहक हॉस्पिटलचे संचालक आणि मुख्य सर्जन डॉ. मोहित भंडारी म्हणाले, लठ्ठपणामुळे गंभीर समस्या होती. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप एपनिया, पल्मोनरी आर्टरी हायपरटेंशन आणि बेड सोर, आदी आजार होते. सहा महिन्यांपासून त्यांचे वजन वेगाने वाढले होते. १५ हजारांपेक्षा जास्त लठ्ठपणाच्या सर्जरीच्या अनुभवानंतरही ही सर्जरी करणे एक मोठे आव्हान होते. सर्जरीकरिता रुग्णाला १५ दिवस लिक्वीड डाएट आणि औषधांवर ठेवण्यात आले. त्यामुळे रुग्णाचे वजन २५ ते ३० किलो कमी झाले. दीपकवर स्लीव्ह गॅस्ट्रिक्टटॉमी सर्जरी करण्यात आली. यापूर्वी डॉ. मोहित भंडारी यांनी बडोदरा येथील ३८५ किलो वजनाचा पुरुष आणि भोपाळ येथील ३५० किलो वजनी महिलेची यशस्वी सर्जरी केली आहे. (वा.प्र.)
४०० किलो वजनी व्यक्तीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:10 AM