निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम जर कृत्रिमरीत्या चालविणे शक्य झाले तर? या तरचे उत्तर भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर(बार्क)ने संशोधनातून पुढे आणले आहे. बार्कच्या टीमने ‘आर्टिफिशियल मॅग्नेटिक हार्ट पंप’चे तंत्र साकार केले असून, अमेरिकेसह जर्मनी व फ्रान्सकडून त्याचे पेटंटही प्राप्त केले आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सतर्फे आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेसाठी उपस्थित असलेले बार्कचे निवृत्त सहसंचालक व डीएईचे माजी चेअरमन डॉ. जतिंदर याखमी यांनी लोकमतशी बोलताना याविषयी माहिती दिली. वास्तविक आर्टिफिशियल हार्ट पंपिंगचे एक उपकरण जर्मनीने विकसित केले आहे. मात्र ते शरीराशी जुळलेले नसते, वॉकरसारखे सोबत चालवत न्यावे लागते व त्याचे वजनही खूप असते. शिवाय त्याची किंमतही ४० लाख रुपये असून, ते पूर्णपणे विद्युतवर अवलंबून आहे, म्हणजे वीज पुरवठा खंडित झाला की ते बिनकामाचे ठरण्याची शक्यता आहे. याबाबत चेन्नईचे कार्डिओसर्जन डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी एक आव्हान आमच्यासमोर ठेवले होते. त्यावर बार्कचे एस.एम. युसूफ यांनी कार्य सुरू केले. डॉ. याखमी हे त्याचे समन्वयक होते. त्यांच्या मते, हे तंत्र मॅग्नेटिक इफे क्टशी जुळलेले आहे. हृदयातकाही बिघाड झाला किंवा ब्लॉकेजेस आले तर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. मात्र अनेकवेळा या शस्त्रक्रियांमुळे इनफेक्शन होण्याचा धोका असतो.बार्कच्या संशोधकांनी मॅग्नेटिक प्रभावाने कृत्रिमपणे हृदय पंपिंगचा फॉर्म्युला विकसित केला. पॉलियुरिथेन या पॉलिमर लिक्वीडमध्ये मॅग्नेटेड नॅनो पार्टिकल्सच्या मिश्रणाने मॅग्नेटिक इफेक्ट तयार केला जातो व त्याद्वारे हार्ट पंप केले जारू शकते. हृदयाच्या झडपांचा वेग कमी-जास्त करण्याचे व ते सतत सुरू राहील, याचे तंत्रही बार्कच्या फॉर्म्युल्यामध्ये मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचे वजन एक ते दीड किलोच्या वर नाही व ते सहज हृदयाजवळ जोडणे शक्य असल्याची माहिती डॉ. याखमी यांनी दिली. बार्कच्या या तंत्राला आंतरराष्ट्रीय पेटंट म्हणून मान्यता मिळाली आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बार्कने हा फॉर्म्युला मांडला असून, आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यास मूर्तरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे उपकरण विकसित झाले तर क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास डॉ. याखमी यांनी व्यक्त केला.स्वप्रभावाने चालेल का एखादी वस्तू ?विश्वातील सर्व सजीव प्राणी स्वत:ची ऊर्जा स्वत: तयार करून हालचाली करीत असतात. मात्र निर्जीव वस्तू बाह्य प्रभावाशिवाय हालचाली करू शकत नाही. विमान असो की रिमोटने चालणारे ड्रोन, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींच्या हालचालीसाठी बाहेरून ऊर्जा पुरविणे आवश्यक असते. रोबोटही बाह्य तंत्रज्ञानाच्या प्रभावानेच हालचाल करू शकतो. पण एखादी वस्तू जी स्वत:च स्वत:ची ऊर्जा निर्माण करून स्वप्रभावाने हालचाल करेल, हे शक्य आहे का? म्हणजे स्वत:च रासायनिक ऊर्जा मेकॅनिकलमध्ये आणि मेकॅनिकल ऊर्जा रासायनिकमध्ये परावर्तित करून हालचाल करणे शक्य आहे काय, यावर जगभरातील संशोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. याखमी यांनी सांगितले.