डीएमएलटी उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 10:41 AM2021-06-29T10:41:40+5:302021-06-29T10:43:47+5:30
Nagpur News डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही, असा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून केंद्र सरकारची अधिसूचना व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सोमवारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने जुलै-२०१८ मध्ये आदेश जारी करून डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तींना पॅथाॅलॉजी लॅब चालवण्याची परवानगी दिली आहे. हा आदेश केंद्र सरकारची अधिसूचना व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार साधी पॅथाॅलॉजी लॅब चालवणारी व्यक्ती एमबीबीएस आणि मध्यम व उच्च तांत्रिक पॅथाॅलॉजी लॅब चालवणारी व्यक्ती एमडी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एमबीबीएस व एमडी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्तीशिवाय इतर कुणाला पॅथाॅलॉजी अहवाल देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे डीएमएलटी अभ्यासक्रम उत्तीर्ण व्यक्ती पॅथाॅलॉजी लॅब चालवू शकत नाही हे घोषित करण्यात यावे व महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचा वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे. असोसिएशनच्या वतीने ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.