लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टर, पोलीस, बँकिंग क्षेत्र, वाहतूक व लॉजिस्टिक, आवश्यक सेवा प्रदान करणारे, अशासकीय संघटना कोरोना वॉरियर्सच्या भूमिकेत असून जीव धोक्यात घालून काम करीत आहेत तर दुसरीकडे पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. ही संघटना आता ऑक्सिजन वॉरियर्सच्या भूमिकेत पुढे आली आहे.
ही संघटना लहान असली तरी नवीन परवाने जारी करण्यासह गरजूंना सिलिंडर उपलब्ध व्हावेत म्हणून निर्माते आणि वैद्यकीय क्षेत्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम निरंतर करीत आहे. हे काम करताना संघटनेतर्फे पेट्रोलियम, गॅस आणि विस्फोटक विषयक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येत आहे. पीईएसओ ब्रिटिशांतर्फे १८९८ मध्ये स्थापन करण्यात आली असून आता भारत सरकारतर्फे संचालन करण्यात येते. १२२ वर्षीय पीईएसओकडे पेट्रोकेमिकल्स, घातक रसायन आणि पदार्थांचा निपटारा करण्यासाठी सरकारतर्फे प्रस्थापित विभिन्न अधिनियमांचे प्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचा रेकॉर्ड आहे. या संघटनेकडे रिफायनरी, पेट्रोलियमचे मोठे टर्मिनल, एलपीजी आणि एलएनजी, पाईपलाईनचे व्यापक नेटवर्क आणि साठे व वितरण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.