नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिशानिर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने नव्याने ‘पेट’ (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) ची नाेंदणी प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत विद्यापीठाकडे पीएचडी साठी ३५०० वर अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र तांत्रिक अडचणींचा ससेमिरा कायम असून काही उमेदवारांनी नाेंदणी हाेत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
पेटची परीक्षा ५, ६ आणि ७ मार्चला होणार आहे. त्यासाठी २४ जानेवारीपासून नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच उमेदवारांना नाेंदणी करता आली नाही. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा परिपत्रक काढून १ फब्रुवारीपासून पुन्हा नाेंदणी सुरू केली. आतापर्यंत ३५०० च्यावर उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील २००० वर उमेदवारांनी शुल्कही जमा केल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. मात्र अनेक उमेदवारांनी नाेंदणी प्रक्रियेत पुन्हा तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले आहे.
या आहेत तक्रारीउमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार १ तारखेपासून नाेंदणी सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र ऑनलाईन नाेंदणी करताना संबंधित उमेदवारांची आधीच नाेंदणी झाल्याचे दर्शविले जात आहे. त्यामुळे त्यांचा लाॅग इन आयडी आणि पासवर्ड तयार हाेण्यास अडचणी येत आहेत. नांदणी झाल्याचे दर्शवित असले तरी त्यांच्या ईमेल किंवा माेबाईलवर याबाबत कुठलेही संदेश येत नाहीत. ३ तारखेलाही याच अडचणी आल्याचे या उमेदवारांनी सांगितले. काहींनी नवे माेबाईल क्रमांक आणि नवीन ईमेल आयडी दिल्यावर नाेंदणी झाल्याचेही सांगितले.
विद्यापीठ म्हणते, काेणत्याही अडचणी नाहीत
याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधला असता नाेंदणी करताना कुठल्याही तांत्रिक अडचणी येत नसल्याचे व तशा तक्रारी न मिळाल्याचे परीक्षा नियंत्रक विभागाने सांगितले. ज्या उमेदवारांनी नाेंदणी प्रक्रिया अर्धवट साेडली असेल त्यांना समस्या येण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या माेबाईल नेटवर्क किंवा चुकीची प्रक्रिया केली असल्याचीही शक्यता विद्यापीठाने व्यक्त केली.
हेल्पलाईन क्रमांक बंददरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत विचारणा करण्यासाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला असता ताे बंद दाखवत असल्याचे सांगितले. वारंवार प्रयत्न करूनही या क्रमांकाद्वारे कुठलीही मदत न झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. विद्यापीठानेही हेल्पलाईन क्रमांकाची अडचण मान्य केली आहे.