काँग्रेस कार्यकर्त्याकडूनच लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका
By योगेश पांडे | Published: August 29, 2024 08:54 PM2024-08-29T20:54:15+5:302024-08-29T20:54:39+5:30
भाजपचा आरोप : लाडकी बहीण विरोधातील याचिकेमुळे राजकीय पारा तापला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाडकी बहीणसह विविध योजनांना उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेमुळे आता राजकारण तापले आहे. भाजपने या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. यात याचिका करणारा व्यक्ती कॉंग्रेस कार्यकर्ता असून जाणुनबुजून ही याचिका करण्यात आली आहे. कॉंग्रेसचा महिलाविरोधी चेहरा उघड झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
अनिल वडपल्लीवार यांनी या योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे. अशा योजनांमुळे राज्याचे आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणूकीत पावित्र्य नष्ट होत आहे. या योजनेचा निर्णय असंवैधानिक व मनमानी पद्धतीचा असल्याचे घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी हा प्रकार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याकडूनच करण्यात आल्याचा दावा केला आहे. अनिल वडपल्लीवार कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांचा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने कॉंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून वडपल्लीवारने लाडकी बहिण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहेत, असा आरोप कुकडे यांनी केला आहे.
काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती . आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वारंवार याबाबत अपप्रचार करण्यात येत आहे, असा दावा कुकडे यांनी केला.
सोशल माध्यमांवरदेखील आक्रमक
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसविरोधात पोस्ट टाकण्यास सुरुवात झाली आहे. अनिल वडपल्लीवार यांचे कॉंग्रेस नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट करण्यात येत असून काँग्रेसकडून महिलांविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.