मनपा क्रीडा संकुल देखभाल टेंडरविरुद्धची याचिका फेटाळली
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: December 1, 2023 06:08 PM2023-12-01T18:08:43+5:302023-12-01T18:09:20+5:30
हायकोर्टाचा निर्णय : प्रक्रियेत पारदर्शकता आढळली.
राकेश घानोडे, नागपूर : संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अटी-शर्तींची अंमलबजावणी आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आग्याराम देवी चौकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाच्या देखभाल व संचालनाच्या टेंडरविरुद्धची याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.
तांत्रिक बोली नामंजूर झाल्यामुळे घाटे ॲण्ड कावरे असोसिएट्सने ही याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत विविध मुद्दे मांडून त्यांची तांत्रिक बोली अवैधपणे नामंजूर करण्यात आल्याचा दावा केला होता. महानगरपालिकेचे वरिष्ठ ॲड. गिरीश कुंटे यांनी त्यांचे दावे निराधार असल्याचे सांगितले. तसेच, रेकॉर्डकडे न्यायालयाचे लक्ष वेधून टेंडर प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली. याचिकाकर्त्यांनी कंत्राटाकरिता पात्रता सिद्ध केली नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आल्यामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला.
मनपाने या तीन वर्षाच्या कंत्राटाकरिता ८ जून २०२२ रोजी टेंडर नोटीस जारी केली होती. परंतु, पहिल्या चार आवाहनांना कोणत्याच फर्मने प्रतिसाद दिला नाही. पाचव्या आवाहनानंतर घाटे ॲण्ड कावरे असोसिएट्स व टेकनिक इंक यांच्यासह तीन फर्मनी बोली सादर केली होती. दरम्यान, सक्षम प्रशिक्षक नसणे, स्पर्धा आयोजनाची कागदपत्रे सादर न करणे इत्यादी बाबी आणि चॅर्टर्ड अकाउंटन्टचे नकारात्मक मत लक्षात घेता १६ मे २०२३ रोजी घाटे ॲण्ड कावरे असोसिएट्सची तांत्रिक बोली नामंजूर करण्यात आली. पुढे टेकनिक इंकला कंत्राटाकरिता पात्र ठरवून त्यांना ३० मे २०२३ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला.