लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुनातील देहव्यापारातून सुटका करून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या एका मुलीने वेगळाच दावा केला आहे. आपण अल्पवयीन नसून बालसुधारगृहातून आता मुक्तता करण्यात यावी, अशी याचिका तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. तिने तिचे वय २१ वर्षे असल्याचा याचिकेत दावा केला आहे.२०१६ साली नागपूर पोलिसांनी गंगाजमुनात टाकलेल्या धाडीदरम्यान परराज्यातील पाच अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती व त्यानंतर त्यांना प्रक्रियेनुसार बालसुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा ताबा मिळावा यासाठी तिच्या काकूने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी सदर मुलगी ही १५ ते १६ वर्षांची असल्याचे तिच्या काकूने न्यायालयास सांगितले होते. तेव्हा तो अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, मुलीने आता ती २१ वर्षांची असल्याचा दावा करीत बालसुधारगृहातून मुक्तता करावी, असा अर्ज न्या. रवी देशपांडे व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सादर केला. यासोबत तिने पुरावादेखील जोडला आहे. दुसरीकडे हा पुरावा बनावट असल्याचा दावा ‘फ्रिडम फर्म’ या सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आला आहे. या संस्थेने एका आठवड्यात सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. संस्थेच्यावतीने अॅड.निहालसिंग राठोड तर मध्यस्थातर्फे अॅड.शशिभूषण वाहणे यांनी बाजू मांडली.