नागपूर : रोड दुरुस्तीसंदर्भातील कराराची पायमल्ली केल्यामुळे इंडियाबुल्स पॉवर कंपनीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी इंडियाबुल्स कंपनीसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.विजय मुंडाळे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, अमरावती जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदींचा समावेश आहे. नांदगावपेठ एमआयडीसी येथे इंडियाबुल्स कंपनीचा एक हजार मेगावॅटचा सोफिया वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वलगाव-नांदगावपेठ रोडवरून कोळसा आणण्यात येतो. यामुळे हा रोड खराब झाला आहे. प्रकल्प उभारण्यापूर्वी इंडियाबुल्स कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये करार झाला आहे. त्यात रोडची देखभाल व दुरुस्ती कंपनी करेल असे ठरले आहे. परंतु, आतापर्यंत कंपनीने एकदाही रोडची दुरुस्ती केली नाही. परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोडवरील धुरामुळे नागरिक आजारी पडत आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अरुण पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
इंडिया बुल्स कंपनीविरुद्ध हायकोर्टात याचिका
By admin | Published: April 11, 2016 3:14 AM