नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने २०१८ साली करण्यात आलेल्या पथसंचलनामध्ये सहभागी स्वयंसेवकांनी पोलिसांची परवानगी नसताना हातात काठ्या बाळगल्या. त्याविरुद्ध मोहनीश जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.
२६ मे २०१८ रोजी पोलीस उपायुक्तांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला विशिष्ट अटींसह परवानगी दिली होती. अटींमध्ये कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही इत्यादींचा समावेश होता. तसेच, अटींचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमातील प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना संघाने २८ मे २०१८ रोजी सार्वजनिक रस्त्यांवर काठ्यांसह पथसंचलन केले.
संघाची ही कृती समाजामध्ये दहशत पसरविणारी आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर एफआयआर नोंदविला जावा, असे जबलपुरे यांचे म्हणणे आहे. जबलपुरे यांनी यासंदर्भात सुरुवातीला २९ मे २०१८ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. ती तक्रार १२ ऑक्टोबर २०१८ रोजी फेटाळण्यात आली. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात केलेला रिव्हिजन अर्जही ६ मे २०१९ रोजी फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मोहन भागवत प्रतिवादीसदर याचिकेत सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे, पोलीस आयुक्त, विशेष शाखा पोलीस उपायुक्त व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर दिवाळीच्या सुट्यानंतर सुनावणी होणार आहे