लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. फडणवीस यांनी अॅट्रासिटीचे प्रकरण लपवून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र हा दावा सिद्ध न करू शकल्याने वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी याचिका केल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्त्यावर न्यायालयाने दंड ठोठावला.याचिकाकर्त्याचे नाव सुरेश रंगारी असे आहे. त्याने १ जानेवारी २०१९ ला वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील पोलीस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. फडणवीस यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना फडणवीस यांनी या गुन्ह्याची माहिती लपवून ठेवली, असा दावा याचिकाकर्त्याने केला. त्याने याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १० ऑक्टोबरला तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर काही कारवाई न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. झका हक व न्या. मुरलीधर गिरटकर याच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकली. यादरम्यान याचिकाकर्त्यास त्याचा दावा सिद्ध करण्यात यश आले नाही. त्यामुळे केवळ वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठीच ही याचिका करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. हा ठपका ठेवत त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. २९ नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयात हा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास याचिकाकर्त्याविरुद्ध जामिनपात्र वॉरंट बजावण्यात येणार आहे. अॅड. अश्विन इंगोले यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.
फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:31 PM
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
ठळक मुद्देवैयक्तिक हित साध्य करण्यासाठी याचिका केल्याचा ठपका