काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 07:52 PM2022-08-22T19:52:47+5:302022-08-22T19:53:25+5:30

Nagpur News काँग्रेस नेत्यांविरुद्ध विविध गुन्हे नोंदविले जावे, याकरिता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तांत्रिक कारणावरून फेटाळून लावल्या.

Petitions seeking registration of crimes against Congress leaders rejected Petitions seeking registration of crimes against Congress leaders rejected | काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या

काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या

Next
ठळक मुद्दे याचिकाकर्ते कृष्णा खोपडे; ज्वाला धोटे यांना चपराक

नागपूर : काँग्रेस नेत्यांविरुद्ध विविध गुन्हे नोंदविले जावे, याकरिता भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तांत्रिक कारणावरून फेटाळून लावल्या. यासंदर्भात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये या याचिका विचारात घेतल्या जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

न्यायमूर्तीद्वय मनीष पितळे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. कृष्णा खोपडे यांनी नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक, विकास ठाकरे, शेख हुसैन व सुनील देशमुख, तर ज्वाला धोटे यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन (दिल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यांनी यासंदर्भात सुरुवातीला पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी त्या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आवश्यक निर्देश द्यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याविषयी प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यामुळे उच्च न्यायालय आपले दार बंद करू शकत नाही, असा मुद्दाही त्यांनी मांडला. परंतु, उच्च न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय लक्षात घेता, या याचिका विचारात घेतल्या जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. अशा याचिकांवर निर्णय दिल्यास, प्रत्येकजण थेट उच्च न्यायालयात धावत येईल व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या तरतुदीला काहीच महत्व उरणार नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

असे आहेत आरोप

काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी १४ जून २०२२ रोजी केंद्र सरकारविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयापुढे आंदोलन केले होते. दरम्यान, संबंधित नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व अवमानजनक वक्तव्ये केली, असा खोपडे यांचा आरोप आहे. कुणाल राऊत व नीरज कुंदन यांनी कुख्यात गुन्हेगार अभिषेक सिंग याला फरार राहण्यास मदत केली, असा धोटे यांचा आरोप आहे. अभिषेक सिंग कुख्यात रोशन शेख गँगचा सदस्य आहे. पोलिसांनी ८ मे २०२० रोजी गौरव दाणी यांच्या तक्रारीवरून शेख व सिंग यांच्यासह एकूण सहा आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६४-ए, ३८४, ३८६, ३८७, ३९७, ५०४, ५०६, भारतीय शस्त्र कायद्यातील कलम ४, २५ आणि मोक्काच्या कलम तीन अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर सिंग फरार होता.

Web Title: Petitions seeking registration of crimes against Congress leaders rejected Petitions seeking registration of crimes against Congress leaders rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.