अडीच महिने लोटूनही कुठलेही आदेश नाही
कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भाचा चेहरा-मोहरा बदलविण्याच्या दाव्यासह प्रस्तावित करण्यात आलेला पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स प्रत्यक्ष जमिनीवर साकार होण्याची कुठलीच चिन्हे दिसून येत नाहीत. या प्रकल्पासाठी टेक्नो फिजिबिलिटी (तांत्रिक व्यावहारिकता) रिपोर्ट तत्काळ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, या आदेशाचे काय झाले काही समजले नाही. याला अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. परंतु, या दिशेने अजूनही कुठलेही पाऊल पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावरच मरणावस्थेत पडला आहे.
गेल्या ३० मे रोजी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विधानसभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विदर्भ इकाॅनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतल्यानंतर विदर्भात पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली होती. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. परंतु, नंतर अशी माहिती समोर आली की, विदर्भातील पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स हा ऑइल रिफायनरी नसलेला असेल. यातच या प्रकल्पासाठी उमरेड व बुटीबोरी येथे जागा निश्चित करण्यात आल्याचा दावाही होऊ लागला. परंतु, प्रत्यक्षात मात्र यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही. इतकेच नव्हे तर पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्सच्या दिशेने आतापर्यंत कुठलेही आदेश जारी झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बॉक्स
इंजिनिअर्स इंडिया लि. ला आदेशाची प्रतीक्षा
पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्ससारख्या प्रकल्पाची टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची कंपनी इंजिनिअर्स इंडिया लि.कडे असते. सरकारकडून निर्देश मिळाल्यानंतर ठरावीक कालावधीत त्यांना रिपोर्ट सादर करावा लागतो. परंतु, अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही कंपनीला यासंदर्भात अजूनही अधिकृतपणे कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. सूत्रानुसार कंपनीने आपल्या स्तरावर हे आदेश मिळविण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु यश आले नाही.
बॉक्स
तत्काळ पुढाकार घेण्याची गरज
आतापर्यंत किमान टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज होती. अगोदरच रिफायनरीशिवाय काॅम्प्लेक्स तयार करण्यात येत असल्याने विदर्भाचे नुकसान झाले आहे. रिफायनरीसह पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स औद्योगिक क्रांती आणू शकतो. त्यामुळे टेक्नो फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून हा प्रकल्प तातडीने साकार करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
प्रदीप माहेश्वरी -
वेदचे उपाध्यक्ष व रिफायनरी-पेट्रोकेमिकल क्षेत्र विशेषज्ञ