नागपूर : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे नाणार येथील रिफायनरी प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. मात्र आता या प्रकल्पासाठी राज्य शासनाने सकारात्मक संकेत दिल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील काही काळापासून विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात पुढाकार घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांचे नाणारसाठी मतपरिवर्तन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
समुद्रकिनारा नसेल तरी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारली जाऊ शकते
या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले होते. गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनादेखील पत्र लिहून राज्य शासनाने नागपूरसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती. देशातील काही प्रकल्पांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूण स्थिती व मागणीचा विचार करता रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोलियम कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सर्वच बाबींचा विचार करता रत्नागिरीऐवजी नागपूरचाच विचार झाला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी असे मोठे प्रकल्प केवळ राजकीय कारणांसाठी टाळले पाहिजेत, असे मत ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.
पश्चिम किनारपट्टीवर अगोदरपासूनच खतांचे युनिट्स
रत्नागिरी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अनेक मोठ्या खतांचे युनिट्स आहेत. ज्यात डीएपी, युरिया, अमोनियम नायट्रेट आणि इतर प्रकारांची जास्तीतजास्त श्रेणी तयार केली जाते. येथे नैसर्गिक वायू, सल्फर, रॉक फॉस्फेट ही रिफायनरीची उपउत्पादने आहेत. गोवा, गुजरातसह पश्चिम किनारपट्टीवर अशी अनेक युनिट्स आहेत.
विदर्भामुळे लॉजिस्टिक खर्चात बचत होईल
विदर्भ आणि मध्य भारत अनेक दशकांपासून रिफायनरीच्या उपउत्पादांच्या लांब पल्ल्याच्या खरेदीवर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे दळणवळण व लॉजिस्टिक खर्चात प्रचंड निधी जातो. रिफायनरीमुळे विदर्भात खतांच्या संपूर्ण श्रेणींचे उत्पादन झाल्यास शेतकरी व सरकार दोघांचाही खर्च वाचेल. तसेच अनुदानाचा बोजादेखील कमी होईल.
मध्य भारतालादेखील फायदा होईल
विदर्भात रिफायनरीची स्थापना झाली तर छत्तीसगड, मध्य प्रदेशसह संपूर्ण मध्य भारताला फायदा होईल. शिवाय या भागाचा आयातीचा खर्चदेखील कमी होईल. विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आले तर त्याचा फायदा संरक्षण क्षेत्रालादेखील होऊ शकतो.
सहज दळणवळणाची सुविधा
रत्नागिरीच्या तुलनेत नागपूर दळणवळणाच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरेल. रस्ते, रेल्वे, विमान मार्गाने नागपूर देशाच्या सर्व भागांशी जोडले गेले आहे. शिवाय विदर्भात विविध ठिकाणी मोठमोठी गोदामे असून, ड्रायपोर्टचादेखील फायदा होईल. रत्नागिरीतून देशाच्या पूर्व, उत्तर, दक्षिण भागात उत्पादने पोहोचविण्यास वेळ लागेल व त्यातून खर्च वाढेल.