लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याचा मुद्दा लावून धरला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहिले असून, विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल, असा दावा केला आहे.
केंद्र सरकारने विदर्भातील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची घोषणा केली होती. मात्र आजतागायत या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. या मुद्यावर आता गडकरी सक्रिय झाले आहेत. ठाकरे आणि देसाई यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ‘वेद’ने दिलेले निवेदन जोडले आहे. यावर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.
या निवेदनात ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे फायदे निदर्शनास आणून दिले आहेत. या प्रकल्पातून महाराष्ट्राला वर्षाला १२ हजार ते १५ हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे त्यात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी बुटीबोरी, मिहान आणि इतर एमआयडीसी भागात सहा हजार एकर जागा उपलब्ध आहे. शिवाय पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. पेंट, टायर, पॉलिस्टर, कापड उद्योगांना याचा भरपूर फायदा होईल.
इतर कोणते फायदे?
- विदर्भात पाच लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- वाळू, मुरुम या गौण खनिजांच्या वापरामुळे राज्य सरकारला पुढील सात वर्षांसाठी दोन ते तीन हजार कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल.
- महाजेनकोला वीज केंद्रातील राखेतून दोन हजार कोटी रुपये मिळतील.
- रिफायनरी विदर्भात आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. वाहतूक वाढल्याने व्हॅटचे उत्पन्नही वाढेल.
- उद्योग आल्याने विजेचा वापर वाढेल, ज्यामुळे ट्रान्समिशन लॉस कमी होईल.