नागपूर : केंद्राच्या मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने नागपूर जिल्ह्यातील १६३ पंपांवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही. त्यामुळे मध्यरात्रीपासून ९० टक्के पंप ‘ड्राय’ झाले आहेत. त्यामुळे स्थिती गंभीर झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या वृत्ताने पंपावर सोमवार सायंकाळपासून वाहनचालकांच्या लांब रांगा लागल्या.
ट्रकचालकांसह टँकरचालकांचेही आंदोलन अनिश्चितकाळासाठी आहे. आंदोलनावर तोडगा निघाल्यास पंपांवर पेट्रोल आणि डिझेल येईल, अन्यथा मंगळवारी वाहनचालकांना इंधन मिळणार नाही. शिवाय या गंभीर समस्येचा त्यांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण होईल, असे पंपचालक म्हणाले.
पेट्रोल व डिझेल खरंच स्वस्त होणार कायअसोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल ८ ते १० रुपयांनी स्वस्त होण्याच्या प्रसार माध्यमांच्या वृत्ताने बहुतांश पंपचालक पेट्रोल आणि डिझेलचा साठा न करता जपून खरेदी करीत आहेत. त्यामुळे सर्वच पंपावर इंधनाचा मोजकाच साठा आहे. त्यात टँकरचालकांच्या संपाने भर टाकली आहे. सोमवारी इंधन पंपावर न पोहोचल्याने बहुतांश पंप ‘ड्राय’ झाले आहेत. याआधी दोनदा इंधनाचे दर कमी झाल्याचा फटका पंपचालकांना बसला आहे. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल ८ रुपये आणि डिझलचे दर १३ रुपयांनी, तर मे-२०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६ रुपयांनी कमी झाले होते. आता ही जोखिम घेण्यास पंपचालक तयार नाहीत. याच कारणाने
पंपावर इंधनाचा मोजकाच साठा आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याच्या वृत्ताने बहुतांश पंपांवर इंधनाचा मोजकाच साठा आहे. शिवाय सोमवारी टँकरचालकांनी आंदोलनात भाग घेतल्याने पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पोहोचले नाही. सोमवारी मध्यरात्रीपासून अनेक पंप ‘ड्राय’ झाले. मध्यरात्री चर्चेतून तोडगा निघाल्यास मंगळवारी टँकर पंपांवर येतील, अन्यथा सोमवारसारखीच स्थिती राहील.मित गुप्ता, अध्यक्ष विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.