नागपूर : पेट्रोलचे दर प्रती लिटर १२०.१४ रुपयांवर पोहोचले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महागाई आणि दरदिवशी होणाऱ्या पेट्रोलच्या दरवाढीवर नागरिक त्रस्त असतानाच पंचशील चौकातील एका पंपावर ‘५० के निचे पेट्रोल नही मिलेगा’ असा बोर्ड लागला आहे. असे बोर्ड नागपुरातील सर्वच पंपावर झळकण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र यावर मौन धरण केले आहे.
देशातील सर्वच पंप डिजिटल झाले असून ग्राहकांना हवे तेवढे पेट्रोल घेण्याची मुभा आहे. ग्राहक कितीही रुपयांचे पेट्रोल गाडीत भरू शकतो. ठराविक किमतीचे पेट्रोल भरण्याचे परिपत्रक कंपनीने काढलेले नाही. संबंधित पंपावर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
ग्राहक सदाशिव बर्वे म्हणाले, पंचशील चौकातील पंपावर गाडीत ४० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास सांगितले असता तेथील डिलिव्हरी बॉयने नकार दिला. कमी किमतीचे पेट्रोल टाकल्यास पंपचालकाला तोटा सहन करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. कुणी कितीही पेट्रोल गाडीत टाकू शकतो, असा नियम आहे. पंपचालक नियम मोडून ग्राहकांची फसवणूक करीत आहे. प्रत्येकवेळी १२० रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकणे शक्य नाही. ४० रुपयांचे पेट्रोल मागितले तर बिघडले कुठे, असा सवाल बर्वे यांनी केला.
पेट्रोल १२०.१४ प्रती लिटर
नागपुरात पेट्रोलचे दर १२०.१४ रुपयांवर गेले आहेत. २२ मार्चपासून पेट्रोलची किंमत दररोज वाढत आहे. तेव्हापासून जवळपास प्रति लिटर १० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाईत भर पडली आहे.
पंपचालक करताहेत कंपनीच्या नियमांचे उल्लंघन
ठराविक रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, असे बोर्ड लावून पंपचालक ग्राहकांच्या अधिकाराचे उल्लंघन करीत आहे. कोणतीही कंपनी असे बोर्ड लावण्यास परवानगी देत नाही. अशा स्थितीत पंपचालकाने बोर्ड लावून ग्राहकांची फसवणूक करीत आहे. याची तक्रार कंपनीकडे करणार आहे.
गजानन पांडे, अध्यक्ष, पश्चिम विभागीय अ.भा. ग्राहक पंचायत.
अशी झाली पेट्रोल दरवाढ
२२ मार्च ११०.५३
२३ मार्च १११.३८
२४ मार्च ११२.२०
२५ मार्च ११३.०४
२६ मार्च ११३.५६
२७ मार्च ११३.८७
२८ मार्च ११४.७१
३० मार्च ११४.५६
३१ मार्च ११६.३८
१ एप्रिल ११७.२२
३ एप्रिल ११८.०५
४ एप्रिल ११८.४७
५ एप्रिल ११९.३१
६ एप्रिल १२०.१४