लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी होत असताना देशांतर्गत स्थानिक शहरांमध्ये तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवून दरकपातीचा फायदा ग्राहकांना मिळू दिला नाही. पण कच्च्या तेलाचे दर थोडेफार वाढताच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले आहेत. २० नोव्हेंबरपासून पेट्रोलचे दर सतत पैशांमध्ये वाढतच आहेत. रविवारी पेट्रोल ९०.५१ रुपये लिटर दराने विक्री झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध करांच्या आकारणीने कच्च्या तेलाच्या दराच्या तुलनेत नागपुरात पेट्रोलचे दर तिप्पट आहेत. पेट्रोल ६० रुपये लिटरपेक्षा कमी दरात विकल्यानंतरही तेल कंपन्यांना फायदा होणार आहे. पण कंपन्या छुप्या कराची आकारणी करून ग्राहकांच्या खिशातून दररोज कोट्यवधी रुपये काढत आहेत. पेट्रोल दरावर देशव्यापी आंदोलन व्हावे, अशी मागणी ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या चढउतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवशी मध्यरात्री बदलले जातात. प्राप्त आकडेवारीनुसार, २९ नोव्हेंबरला पेट्रोल प्रति लिटर ८९.४७ रुपये होते. हे दर ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला कायम होते. पण २ डिसेंबरला त्यात १५ पैसे, ३ रोजी १६ पैसे, ४ रोजी २० पैसे, ५ रोजी २६ पैसे आणि ६ डिसेंबरला २७ पैशांनी वाढून दर ९०.५१ रुपयांवर पोहोचले. याशिवाय १ नोव्हेंबरला दर ८८.२९ रुपये होते. हे दर १९ नोव्हेंबरपर्यंत कायम होते. पण २० नोव्हेंबरपासून पुन्हा दरवाढ सुरू झाली आणि ६ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. या दिवसात १५ ते ३० पैशांनुसार दरवाढ होत राहिली. अशीच वाढ दरदिवशी सुरू राहिल्यास दोन महिन्यात पेट्रोल १०० रुपये लिटर होईल, अशी शक्यता पेट्रोल डीलर्सनी व्यक्त केली.
तारीख पेट्रोल दर (प्र.लि.)
२९ नोव्हें. ८९.४७ रु.
२ डिसें. ८९.६२ रु.
३ डिसें. ८९.७८ रु.
४ डिसें. ८९.९८ रु.
५ डिसें. ९०.२४ रु.
६ डिसें. ९०.५१ रु.