नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल यांच्या लग्न समारंभात देशातील पेट्रोल-डिझेल व घरगुती सिलिंडरच्या वाढत्या किमतीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नवदाम्पत्यास पेट्रोल, डिझेल व घरगुती सिलिंडर सप्रेम भेट म्हणून दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझरही भेट म्हणून देण्यात आले. परंतु यावेळी काही पदाधिकारी मात्र स्वत: मास्क घालून नव्हते.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पेट्रोल १०० रुपयाच्या जवळ पोहोचले आहे. परंतु पंतप्रधान मौन आहेत. लोक महागाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांना ही भेट देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंह, सचिव आसिफ शेख, शहर उपाध्यक्ष धीरज पांडे, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे, महासचिव शैलेश पडोळे, मुकुंद साखरकर, भूषण टेंभुर्णे आदी उपस्थित होते.