नागपूर : दैनंदिन वाहतुकीसाठी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींपेक्षा आकाशात भरारी घेण्यासाठी विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाचे (एटीएफ) भाव कमी आहेत, असे सांगितले तर कुणालाही विश्वास बसणार नाही ! पण हे खरे आहे. विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग असताना वाहन चालविणे कसे परवडणार, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.
इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत? त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे इंधनावरील कराचा भार विमानाने प्रवास करणाऱ्यांपेक्षा ट्रकचालकांसारख्या सर्वसामान्यांना अधिक पेलावा लागत असल्याचे निदर्शनास येते.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण आहेत. नागपुरात पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०७.६२ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९५.८० रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या ‘एटीएफ’ इंधनाचा भाव मात्र प्रतिलिटर ६६.०६ रुपये आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले, विमानाला लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला ‘सेस’ (उपकर) विमानाच्या इंधनावर नाही. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कृषी अधिभारही विमानाच्या इंधनावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ट्रकसारखी अवजड मालवाहतूक वाहने ज्यावर चालतात, त्या डिझेलच्या प्रतिलिटर किमतीपेक्षा विमानाचे प्रतिलिटर इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात येणारा सेस हा एटीएफवर आकारला जात नाही.
राज्य सरकारने डिझेलपेक्षा विमानाच्या इंधनावर अधिक ‘व्हॅट’ (मूल्यवर्धित कर) लावला आहे. तरीही दोन्ही इंधनांच्या दरांत मोठी तफावत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर आणि अधिभार विमानाच्या इंधनावर लागणाऱ्या कराच्या पातळीत आणले, तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हा बघा फरक ! (दर प्रतिलिटर)
विमानातील इंधन एटीएफचे दर - ६६.०६ रुपये लिटर
दैनंदिन वाहनातील पेट्रोलचे दर - १०७.६२ रुपये लिटर
शहरातील पेट्रोल पंप - ८४
रोज लागणारे पेट्रोल - ५.५० लाख लिटर
शहरातील वाहनांची संख्या :
दुचाकी - १०,३७,९२७
चारचाकी - ३,१८,३८२
कोरोनामुळे खर्चात भर; ५०० च्या ठिकाणी लागतात हजार
कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. परिणामी प्रत्येक कुटुंबाचा पेट्रोलचा खर्च वाढला आहे. दुचाकीचालक सुनील चव्हाण म्हणाले, रोज नंदनवन, रमणा मारोती येथील राहत्या घरापासून वाडी कार्यालयात जाण्यासाठी आणि इतर कामांसाठी रोज दीड लिटर पेट्रोल लागते. जानेवारी महिन्यात पेट्रोलचे दर जवळपास ९० रुपये प्रतिलिटर होते. आता १०७.६२ रुपये आहेत. त्यामुळे दररोज २५ रुपये जास्त लागतात. महिन्याच्या हिशेब धरल्यास ७५० ते ८०० रुपये पेट्रोलसाठी जास्त द्यावे लागतात. मार्केटिंगच्या कामासाठी नागपुरात आलो तर अडीच लिटर पेट्रोल लागते. त्यामुळे पेट्रोलचा खर्च दीडपट वाढला आहे.
कोरोनानंतर पगारात कपात झाली, पण त्या तुलनेत इंधनाचा खर्च वाढला आहे. वाहनात पेट्रोल भरताना नेहमीच अडचण होते. सरकारला दोष देत वाहनात पेट्रोल भरतो. महागाईच्या काळात सरकारने पेट्रोलवरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
संतोेष खडतकर, वाहनचालक.
अनेकदा विचार करूनच कारमध्ये डिझेल टाकावे लागते. लॉकडाऊनच्या काळात दुकानावर वेळेचे बंधन आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. जानेवारीच्या ८१ रुपयांच्या तुलनेत आता डिझेलचे दर ९५.८० रुपये असून तब्बल १६ रुपयांची वाढ झाली आहे.
प्रशांत निंबर्ते, वाहनचालक.